निदान तर झाले, इलाज कधी?

0
‘मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व वाङ्मयीन विकासाचा काही संबंध उरलेला नाही. अध्यक्षपदासाठी आता साहित्यिकांच्या टोळ्या कार्यरत असतात.

प्रादेशिक अस्मिता, परस्पर हितसंबंध व गटातटाचे राजकारण यातून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवले जातात. यामुळेच शरदचंद्र मुक्तिबोधांसारखे अनेक दिग्गज कधीही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत’ अशी बोचरी टीका अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे.

राजकारण हे केवळ सरकारी यंत्रणेचेच नव्हे तर सर्वांच्या जीवनाशी संबंधित अंग बनले आहे. दुर्दैवाने साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. सरकारी अनुदानानिमित्ताने सारस्वतांच्या दरबारात राजकारण्यांची उठबस सुरू झाली. त्यालाही आता बराच काळ उलटला. ‘साहित्याच्या प्रांगणात राजकारण्यांचे काय काम?’ हा प्रश्न अधून-मधून विचारला जात असला तरी साहित्यक्षेत्रात राजकारण व राजकारण्यांची उठबस थांबलेली नाही, हे जोशी यांनी अधिक स्पष्ट केले. या मुद्यावर अनेकदा चर्वितचर्वण झाले आहे.

सरकारची आर्थिक मदत हवी; पण व्यासपीठावर नेते नकोत, अशी जाहीर भूमिका पु. ल. देशपांडे यांनी घेतली होती. साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये. मते मिळवणे हे राजकारण्यांचे काम आहे. साहित्यिकांनी तो कित्ता गिरवू नये. निवडणूक प्रक्रियेमुळे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान व समाजावर प्रभाव असणारे साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले आहेत. माजी संमेलनाध्यक्षांनीच एकत्र विचार करून नव्या अध्यक्षांची निवड करावी, अशी सूचना शरद पवार यांनी केली होती.

साहित्य क्षेत्रात साहित्यिकांच्या कंपूशाहीचे अंतर्गत राजकारण चालते हे आता सर्वविदित आहे. त्यामुळे अनेक नामवंत साहित्यिक साहित्य संमेलनापासून फटकून राहतात. विशिष्ट विभागांची जहागिरी टिकून राहावी किंवा निर्माण करावी या विचाराचे प्राबल्य साहित्य विश्वातही जाणवते. जाणत्या मंडळींनी वेळोवेळी दुखण्याचे नेमके निदान केले आहे; पण तेवढे पुरेसे आहे का? दुखणे दूर करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतात.

चर्चेला विधायक वळण द्यावे लागते. साहित्यिक व साहित्य रसिकांच्या विचारांचा आदर होईल, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. हे साहित्य क्षेत्राचे दुर्दैवच! ‘नवल अहंकाराची गोठी । विशेषे न लगे अज्ञानापाठी । सज्ञानाच्या झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥’ ही ओवी साहित्यिकांना ठाऊक नसेल का? तरीही आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान साहित्यिक कसे विसरतात? साहित्यिकांच्या प्रतिमेला व लौकिकाला उणेपण येणे हे समाजस्वास्थ्याला उपकारक नाही, याची आठवण साहित्यिक ठेवतील का?

LEAVE A REPLY

*