कालसुसंगत व्यवहार्य सूचना

0
‘मुलांना योग्य वयात कायद्याने ज्ञान आणि सामाजिक वर्तनाचे भान देणे ही काळाची गरज आहे. म्हणून आत्मसंरक्षण हा विषय अभ्यासक्रमातच समाविष्ट करावा. पालकांनी अर्थार्जन करणे ही अनेक कुटुंबांतील अपरिहार्यता आहे. ज्येष्ठांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते, असे सध्याचे सामाजिक चित्र आहे.

मुलांकडे लक्ष द्यायला कोणाकडेही वेळ नाही. म्हणून केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यायला हवे व या प्रशिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा’ अशी सूचना विद्या चव्हाण यांनी विधानसभेत बोलताना केली आहे. महिला व मुलींसाठी सामाजिक वातावरण पुरेसे सुरक्षित का नाही? अनेक कायदे असून मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

विकृत गुन्हेगारी प्रवृत्तीकडून वयाचे भान कसे ठेवले जाणार? मुलींनी घराबाहेर पडू नये, बाहेर पडताना पुरुष कुटुंबिय सोबत असावा, सातच्या आत घरात यावे हे उपाय सामाजिक विकृती कशी थांबवणार? म्हणून विद्याताईंनी सुचवलेला मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपाय समर्पक वाटतो. ‘आजची सामाजिक स्थिती अशांत बनली आहे.

समाजातील सलोखा, शांतता व सौहार्द कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कायद्याचे ज्ञान दिले पाहिजे. कायदा साक्षरता आवश्यक मानली पाहिजे’ असे मत राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती थूल यांनी व्यक्त केले आहे.

दोन्ही सूचना उपयुक्त ठरू शकतील. दिवसेंदिवस समाजातील कायद्यांविषयीची बेपर्वाई वाढतच आहे. कायदे पाळण्यापेक्षा झुगारण्यासाठीच असतात, अशा ठाम समजुतीतून कायद्याला उघड-उघड आव्हान देण्याची नेतेगिरी वाढत आहे. राजकीय नेतृत्वाची धार वाढवण्यासाठी कायदे वेठीला धरण्याची प्रवृत्ती गल्ली ते दिल्लीपर्यंत रुजली आहे. नेत्यांच्या कृपेच्या खात्रीने तथाकथित भाई-दादा-आप्पा-भाऊंना कायद्याचा धाक वाटेनासा झाला आहे.

कायदा हातात घेऊन सरकारी सेवकांशी उर्मट वर्तन केले, वाहतूक पोलिसांच्या अंगावर वाहन घातले वा महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केले तरी आपले कोणी वाकडे करू शकत नाही, असा विश्वास तथाकथित स्वयंघोषित ‘कार्यकर्त्यां’ना वाटू लागला आहे. बाल्यावस्था ते पौगंडावस्थेपर्यंतचा काळ मुलांच्या मानसिक वाढीच्या दृष्टीने संवेदनशील असतो. या वयात जे शिकवले जाते त्याचा प्रभाव खोलवर रुजतो.

यादृष्टीने संवेदनशील वयात मुलांना कायद्याचे ज्ञान व भान देणे समाजासाठी उपकारक ठरेल. मात्र अशा विशिष्ट विषयांचे अभ्यासक्रम बनवण्याची जबाबदारी त्या विषयातील जाणकारांकडे सोपवणे आवश्यक आहे. अन्यथा राजकीय कृपापात्रांनी सध्या शिक्षण क्षेत्रात घातलेल्या गोंधळात आणखी एकाची भर पडण्याचा धोका नजरेआड होऊ नये.

LEAVE A REPLY

*