आकांक्षा सफल होवोत!

0
केंद्रातील मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प विधिमंडळात परवा सादर केला.

केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकर्‍यांना झुकते माप देण्यात आले. राज्य सरकारनेही तोच शिरस्ता यंदाच्या अर्थसंकल्पात पाळला आहे.

अर्थसंकल्पात शेती, शेतकरी आणि रोजगाराशी निगडीत योजना घोषित झाल्या आहेत. त्यासाठी पंचाहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद नमूद केली आहे.

महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य! त्यामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीत शेतीला प्राधान्य देणे आवश्यकच ठरते. राज्य सरकारने तेच केले. तथापि सरकारने गेल्यावर्षी शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची अजून पूर्तता झालेली नाही.

हजारो शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

सरकार शेतकर्‍यांचे समाधान करू शकलेले नाही. जाहिरातबाजीवरच सरकारचा जास्त भर असल्याचे जनतेला भासतेे. शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत.

आंदोलने होतच आहेत. किसान सभेच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर आज हजारो शेतकरी मोर्चा घेऊन थडकणार आहेत.

एसटी बसमधून सवलतीच्या दराने शेतीमाल वाहतूक, ‘जलयुक्त शिवार’साठी पंधराशे कोटी, सूक्ष्म सिंचनासाठी चारशे कोटी, विहिरी-शेततळ्यांसाठी एकशे साठ कोटी, मराठवाडा-विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दोन रुपये किलो तांदूळ व तीन रुपये किलो दराने गहू पुरवण्यासाठी नऊशे कोटी, सिंचन प्रकल्पांसाठी तीन हजार कोटी, पन्नास पाटबंधारे प्रकल्पपूर्तीचे उद्दिष्ट, रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ, खासगी सहभाग व केंद्र सरकारच्या मदतीने सहा कौशल्य विद्यापीठे, दीड लाख घरे बांधणे आदी भरघोस लोककल्याणकारी योजना अर्थसंकल्पात नमूद आहेत.

सर्व योजना तशा अत्यंत आकर्षक आहेत. विविध घटकांचे हित साधू शकतील अशा आहेत; पण या योजना तडीस कशा जाणार? सरकारकडे तेवढा पैसा आहे का? देशात सध्या पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा गाजत आहे.

घोटाळेबाजांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई चालू आहे. या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

बँकेला एवढा मोठा चुना लागल्यानंतर सरकारी बँकांसह इतर सर्व बँका वित्तपुरवठ्याबाबत कोणते धोरण स्वीकारतात यावर देशातील विकास योजनांचे भवितव्य अवलंबून राहील.

तथापि महाराष्ट्राच्या भल्यासाठी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजना यशस्वी व्हाव्यात व कल्याणकारी महाराष्ट्राचे प्रभावी चित्र अन्य राज्यांसमोर उभे राहावे, हीच जनतेची अपेक्षा राहील.

LEAVE A REPLY

*