‘कल्याणा’ची दिशा कोणती?

0
सध्या देशात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी प्रचंड किंमत मोजावी लागतेे. यामुळे जनसामान्यांना उपचार घेणे अवघड होत चालले आहे. सरकारने सामान्य जनतेच्या अडचणी समजावून घ्याव्यात व याबाबत तात्काळ पावले उचलावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.

वायुप्रदूषणाचा नागरिकांवर होणारा परिणाम व त्यावर उपचारांसाठी करावा लागणारा खर्च याचा कोणता अभ्यास सरकार करीत आहे? असा प्रश्नही न्यायसंस्थेने विचारला आहे. वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस अत्यंत महागडे होत आहेत. कारणे वेगवेगळी असली तरी किरकोळ आजारांवरचे उपचार व संबंधित चाचण्यांचे दरसुद्धा सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. परिणामी जनतेला सरकारी आरोग्यसेवेवर अवलंबून राहावे लागते.

सरकारच्या धोरणातील धरसोड वृत्तीमुळे आरोग्यसेवाच अतिदक्षता विभागात दाखल होईल की काय, अशी भीती वैद्यकीय सूत्रांनी अनेकदा व्यक्त केली आहे. जनता नेहमीच या गैरव्यवस्थेचा बळी ठरते. न्यायसंस्थेने मांडलेले मत सरकारसाठी दिशादर्शक आहे; पण केवळ दिशा दाखवण्याची सूचक भाषा सुस्त सरकारी यंत्रणेला पुरेशी ठरेल का? सरकारने जनकल्याणकारी कारभार करायला हवा ही जनतेची व न्यायसंस्थेची अपेक्षा रास्त आहे;

पण सरकारला तसे करण्यात खरेच रस आहे का? अन्यथा केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्यासाठी आलेले 750 कोटी रुपये खर्च करण्यात राज्याच्या आरोग्य विभागाला अपयश का आले असते? लहान मुलांच्या लसीकरणावरील किंवा जननी सुरक्षा योजनेवरील खर्चही गेल्या तीन वर्षांत सातत्याने कमी का झाला असता?

राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाचे वीस लाख रुग्णांचे लक्ष्य एक लाखाने कमी केले. तरीही लक्ष्य पुरे का करता आले नाही? राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाने हे निष्कर्ष काढले आहेत.

हे कशाचे द्योतक आहे? सरकारी सेवकांच्या कल्याणाच्या योजना जितक्या तातडीने अमलात येतात ती तत्परता जनतेच्या वाट्याला का नसावी? राज्यात महसुली खर्चाच्या 35 टक्के खर्च शासकीय सेवकांचे वेतन व 10 टक्के खर्च निवृत्तीवेतनावर होतो. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यावर त्यात वाढच होणार आहे.

सरकारी ‘कल्याणा’च्या सुसाट सुटलेल्या या गाड्या कोणत्या ‘धर्मस्थळा’वर जाऊन धडकतील याचा अंदाज सरकारला तरी आहे का? सरकारला बजावताना न्यायसंस्थेला जनतेचे कल्याण अभिप्रेत आहे. तथापि सरकारी बाबूंचे लक्ष आकर्षून घेण्यात एकच ‘ठाणे’ उजवे का पडते? सर्वच ठाण्यांकडे समानतेच्या भूमिकेतून कधी बघितले जाणार आहे का?

LEAVE A REPLY

*