अहमदाबादच्या उशीर पंडित दुरांत न्यूयॉर्क राज्यातील सर्वोच्च न्यायालयात बनल्या न्यायाधीश

0

नवी दिल्ली : अहमदाबाद येथील रहीवासी असलेल्या उशीर पंडित दुरांत यांची अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात न्याायाधीश म्हणून नियुक्त झाली आहे.

‘मी भगवद्गगीतेवर हात ठेवून शपथ घेते की…’ असं म्हणत मुळच्या अहमदाबादच्या असलेल्या उशीर पंडित-दुरांत यांनी न्यूयॉर्क राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली. एकेकाळी इंग्रजीही बोलता न येणाऱ्या उशीर यांनी अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारली.

५७ वर्षांच्या न्या. उशीर पंडित-दुरांत यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. उशीर ११ वर्षांच्या असताना त्यांच्या कुटुंबाने अमेरिकेत स्थलांतर केलं होतं. उशीर यांनी अमेरिकेत पाऊलं ठेवलं तेव्हा त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता. पण त्या यामुळे खचल्या नाहीत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी इंग्रजी आत्मसात केलं. अमेरिका समजून घेता घेता त्यांनी अमेरिकी संस्कृती आपलीशी केली आणि अमेरिकेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

न्यूयॉर्क लॉ स्कूलमधून उशीर यांनी कायद्याची पदवी मिळवली तेव्हा त्यांच्यासोबतचे बहुसंख्य विद्यार्थी खाजगी कायदे संस्थांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी शोधत होते. पण उशीर यांनी मात्र क्वीन्स जिल्ह्यात सरकारी वकील होणं पसंत केलं.

१५ वर्षं ‘डिस्ट्रीक्ट अॅटॉर्नी’ म्हणून काम केल्यानंतर २०१५मध्ये त्यांची क्वीन्स जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर चारच वर्षांत त्यांची न्यूयॉर्क राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली.

आता पुढची चौदा वर्षं न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्यायदान करता येणार आहे. भगवदगीतेवर हात ठेवून न्यायाधीशपदाची शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकी न्यायाधीश ठरल्या आहेत.

LEAVE A REPLY

*