ही अमानुषता कोण थांबवणार?

0
नागपूर येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रँगिंगचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. बीएएमएसचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याला रॅगिंगच्या नावाखाली मूत्रमिश्रीत फिनाईल व नंतर विषारी औषध पाजण्यात आले. बेदम मारहाण करण्यात आली. ‘मी उपाशी आहे.

मला मारू नका’ ही त्याची विनवणीही ज्येष्ठ विद्यार्थ्यांना दयेचा पाझर फोडण्यास अपुरी ठरली. तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी त्यांच्या कीर्तीला साजेशी टाळाटाळ केली, असे बोलले जाते. राजस्थानातील सवाईमाधोपूरमध्येही कुणा तांत्रिक बाबाच्या अघोरी उपचारांमुळे एका तरुणीला आपला जीव हकनाक गमवावा लागला. उपचारांच्या नावाखाली मांत्रिकाने तरुणीला दीड महिना घरातच डांबून ठेवले. देवीने तिच्या अंगात प्रवेश केला आहे, असे तो सांगत राहिला.

त्याने घरातच तिचे मंदिर बनवले होते. दरम्यानच्या काळात तरुणीचा मृत्यू झाला तरी त्याचे उपचार सुरूच होते. दुर्गंधी येऊ लागल्यावर ही घटना उघडकीस आली. तरुणीच्या बहिणीलाही आई-वडिलांनी घरात कैद करून ठेवले होते; पण तिने स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर भावाच्या मदतीने या घटनेवर प्रकाश पाडला. मंगळावर स्वारी करण्याची जगाची तयारी सुरू असताना माणसातील अमानुषता दब्या पावलांनी समाजजीवन क्षतिग्रस्त करू लागली आहे.

माणसाचे आपल्यासारख्याच हाडामांसाच्या दुसर्‍या माणसाशी क्रूर वर्तन का घडते? समाजशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञांसमोर असे वर्तन प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. प्रेम, सौहार्द, माणुसकी, आपुलकी, सहिष्णुता या मानवी भावनांचा व संवेदनांचा पराभव का होत आहे? परस्पर स्नेहभाव जोपासणे माणसे विसरत चालली आहेत का? सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे व मने दूषित करण्याचे उद्योग सुखनैव कसे सुरू राहू शकतात?

अंधश्रद्धा व रॅगिंगविरोधी कायदे अस्तित्वात असतानाही समाजकंटकांना त्यांचा धाक का वाटत नसावा? कायद्याचा धाक निर्माण करण्याची व गुन्हेगारी दुर्वर्तन करणार्‍यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी सरकार टाळू शकणार नाही. कायद्याचे राज्य चालवण्याची जबाबदारी स्वीकारणे व वास्तवात त्याची अंमलबजावणी करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याचे भान सरकारला का नसावे?

ते भान असते तर राज्य सरकारांशी ‘मन की बात’ करण्याची वेळ पंतप्रधानांवर वारंवार आली असती का? ‘कायदे हातात घेणार्‍यांची गय करू नका’ हे पंतप्रधानांचे म्हणणे राज्य सरकारे का ऐकत नाहीत? हे असेच चालू राहिले तर समाजातील अमानुषता कोण थांबवणार?

LEAVE A REPLY

*