शेतकर्‍यांना डावलुन व्यापार्‍यांच्या तुर खरेदीस प्राधान्य : पाचोरा तुर खरेदी केंद्रातील प्रकार

0
पाचोरा | प्रतिनिधी :  पाचोरा येथील शासकीय तुर खरेदी केंद्रावर मुदतीच्या शेवटच्या दिवशी शेतकर्‍यांच्या तुर खरदीस प्राधान्य न देता व्यापार्‍यांच्या तुरीची मोजणी करण्यात आली.ताटकळत ठेवलेल्या शेतकर्‍यांनी संतप्त होवुन  रस्ता रोको केला.

तसेच बारदान संपल्याचे कारण पुढे करण्यात आले. शेतकरी सहकारी संघास दिलेल्या तुर खरेदीच्या अधिकारात तुर खरेदी केंद्रावर कोणतेही नियोजन नसल्याने शेतकर्‍यांचे अतोनात हाल झाले.

संतप्त शेतकर्‍यांनी शासना बाबत प्रचंड रोष व्यक्त करुन हे सरकार शेतकर्‍यांचे वाली नसुन व्यापार्‍यांचे भले करणारे असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सदर प्रकारची माहिती आ. किशोर पाटील यांना कळताच त्यांनी तुर खरेदी केंद्रावर येवुन शेतकर्‍यांच्या समस्या जाणुन घेत सुचना केल्या.

जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या तुर खरेदी साठी चार केंद्रांना अधिकार देण्यात आले आहे. त्यात पाचोरा येथील शेतकरी सहकारी संघास हा अधिकार देण्यात आला. मागील मार्च महिन्यापासुन तुर खरेदी सुरु करण्यात आली होती.

दि. ३१ मे हि तुर खरेदीची अंतिम मुदत असल्याने बाजार समितीच्या वतीने तुर विक्री करणार्‍या फोन लावुन बोलावण्यात आले होते. त्यानुसार शेकडो शेतकरी पाचोरा, चाळीसगांव, अमळनेर, चोपडा व तालुक्यातुन पाचोरा केंद्रावर त्यांची तुर घेवुन विक्रीस आले होते. पाचोरा बाजार समितीच्या वतीने टोकन देवुन वखार महामंडळाच्या परिसरात तुर मोजणी करण्यात येत होती.

व्यापार्‍यांकडुन बोगस उतार्‍यांचा वापर शेतकर्‍यांच्या तुर मोजणीस प्रथम प्राधान्य न देता व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या नावाचे बोगस उतारे खरेदी अधिकार्‍यांना दाखवुन तुर मोजणी करण्यास प्रवृत्त केले. ही बाब उपस्थित शेकडो शेतकर्‍यांच्या ध्यानात आल्याने शेतकर्‍यांनी या प्रकारची विचारणा करण्यास सुरुवात करुन होणार्‍या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

संबधीत अधिकार्‍यांना हेक्टरी १० क्विंटन तुर मोजणीचे निर्देश असतांना नियमांचे उल्लंघन करुन शेतकर्‍यांची तुर असल्याचे भासवुन व्यापार्‍यांनी मोठ्या वाहनामंधुन आणलेल्या तुरीची मोजणीत प्राधान्य देवुन शेतकर्‍यांना ताटकळत ठेवले.

शेतकर्‍यांचा ३१ मे ही तुर विक्रीची शेवटची मुदत असल्याने पाचोरा तालुक्यासह अन्य तालुक्यातुन आलेल्या व बोलवलेल्या शेतकर्‍यांच्या वाहनांच्या रांगा तुर खरेदी केंद्रावर लागल्या होत्या.

या रांगामध्ये व्यापार्‍यांनीही त्यांची वाहने उभी केली होती. सकाळी ८ वाजता तुर मोजणी सुरु करण्यात आली होती. मात्र १२ वाजेपर्यंत एकही शेतकर्‍यांची तुर न मोजता व्यापार्‍यांची तुर मोजली जात होती.

हा प्रकार समक्ष डोळ्यांनी पाहणार्‍या शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला. संबधीत अधिकारी शेतकर्‍यांचे काही ऐकुन न घेता मनमानी करीत होते. पावसाळी वातावरण सकाळ पासुन ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अन्न पाणी नसणारे शेतकरी तुर मोजणीची वाट पाहत होते.

भाड्याने आणलेली वाहने आणि पाऊस सुरु झाल्यास शेवटी नाईलाजास्तव शेतकर्‍यांना अचानक रस्ता रोको करण्याची भुमिका घ्यावी लागली.

बारदान संपल्याचे कारण दाखविले शेकडो शेतकर्‍यांची तुर मोजणी न करता व्यापार्‍यांना प्राधान्य दिल्याने दुपारी चार वाजे नंतर बारदान संपले होते. जामनेर येथुन बारदान मागविले आहे. आता संध्याकाळ झाली. उद्या मोजणी करु मोजणारे हमाल कामगार ही मोजण्यास नकार देत असल्याने शेतकर्‍यांची कुचंबणा झाली.

आमदारांनी घेतली दखल तुर खरेदी केंद्रावर चाललेला सावळा गोंधळ व नियोजनाचा अभावामुळे तसेच कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या समस्येची माहिती आ. किशोर पाटील यांना कळताच त्यांनी तुर खरेदी केंद्रावर येवुन शेतकर्‍यांच्या समस्या जाणुन घेतल्या.

झालेल्या प्रकारांबाबत शेतकर्‍यांनी संतप्त भावना आमदारांजवळ व्यक्त केल्या. शेतकर्‍यांच्या अडचणीची दखल घेवुन आ. किशोर पाटील यांनी टोकन धारक शेतकर्‍यांच्या तुरीची मोजणी तात्काळ करण्याच्या सुचना दिल्या.

बोगस उतार्‍यांच्या चौकशीची मागणी पाचोरा केंद्रावर मार्च महिन्यापासुन सुरु असलेल्या तुर खरेदीत व्यापार्‍यांनी बाजार समितीत ३२०० रु भावाची तुर खरेदी करुन शासनाच्या खरेदी केंद्रावर ५०५० रु चा भाव घेवुन शेतकर्‍यांचे हेक्टरी उतारे जमा करुन नफा कमविण्याचा गोरख धंदा केल्याचे प्रकार चर्चेत होते.

शासनाची फसवणुक करुन व शेतकर्‍यांच्या उतार्‍यंाचा वापर करुन दिशाभुल करणार्‍यांच्या बोगस उतार्‍यांवरील मोजलेला तुर खरेदीची चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*