सेवाकार्यात भावना त्यागाची!

0
जळगाव । विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून आसाम, अरुणाचलमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्य करणार्‍या मीरा कुळकर्णी आणि यवतमाळ जिल्ह्यात पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारे दिनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला.

समाजाच्या सेवा कार्यात त्यागाची भावना असल्याचे दोन्ही पुरस्कारार्थींनी यावेळी सांगितले.

केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे स्व.डॉ.अविनाश आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार दिला जातो. यावर्षी वैयक्तिक गटातून आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून मुलां-मुलींचे शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचे जागरण करण्यासाठी योगदान असलेल्या मीरा कुळकर्णी आणि संस्थात्मक गटातून यवतमाळ जिल्ह्यात पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणार्‍या दिनदयाल बहुउद्देशीय संस्थेला पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्यापूर्वी दोन्ही पुरस्कारार्थींनी पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधून कार्याची माहिती दिली. मीराताई कुळकर्णी म्हणाल्या की, 1997 पासून विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये काम सुरु केले आहे. अरुणाचलमध्ये 36 व आसाममध्ये 22 शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागरणाचे कार्य सुरु आहे. विद्यार्थींनींना स्वावलंबी होणेसाठी प्रशिक्षण दिले जाते. ‘आनंदालय’च्या माध्यमातून आसाममध्ये चहाच्या मळ्यात शिक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सेवा कार्य करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असल्याचा अनुभव देखील त्यांनी कथन केला.

अरुणाचलमध्ये स्त्री-पुरुष भेद नसल्याचेही त्यांनी प्रकर्षाने सांगितले. त्यानंतर दिनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी आपल्या कार्याची माहिती दिली. 1997 पासून सुरु असलेले कार्य समाधानकारक आणि प्रगती पथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचे काम सुरु आहे. विवेकानंद छात्रावासची स्थापना केल्यानंतर जवळपास 300 विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले आहेत.

त्यातील 165 विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. एका खाजगी बँकेकडून कर्ज घेवून दिल्यामुळे 25 मुलांनी व्यवसाय सुरु केला आहे. संस्थेच्या माध्यमातून केशव आरोग्य रक्षक योजना, संस्कार केंद्र, कुटुंब आधार योजना, शेतकरी विकास योजना आणि दिनदयाल प्रबोधिनीद्वारे प्रबोधन सुरु असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी सांगितले. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रकाश पाठक, स्वाप्निल चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*