लोकांच्या अपेक्षा, मागण्यांनुसार प्राधान्यक्रम ठरविणार! – नूतन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

0

जळगाव । सोलापूरला आयुक्त असताना तेथील प्रश्न व प्राधान्यक्रम हा वेगळा होता. आता जिल्हाधिकारी म्हणून प्राधान्यक्रम वेगळा असेल, मला काय वाटते यापेक्षा लोकांच्या अपेक्षा काय त्यांच्या मागण्या काय यानुसार कामाचे नियोजन करून प्राधान्यक्रम ठरवेल, असे मत नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले.

डॉ ढाकणे यांनी आज मावळते जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यानंतर ते बोलत होते.   किशोर राजेनिंबाळकर हे मला सिनिअर आहेत, तुला जळगावला यायचे आहे, हे त्यांनी आधीच सांगितले होते, त्यानुसार मी तयार होतो. मी सोलापूर, नाशिक आदी ठिकाणी कामे केली आहे. जळगावची माहिती घेत आहे. लवकरच सर्वांकडून येथील प्रश्न समजून घेईल, येत्या दहा पंधरा दिवसात ध्येय निश्चित करेल, असे अविनाश ढाकणे म्हणाले. दरम्यान, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बुके देऊन किशोर राजेनिंबाळकर यांना निरोपही दिला.

सर्वांचे सहकार्य – निंबाळकर

दोन वर्ष जळगावात संधी मिळाली, मी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त अशी दोनही पदांची सांगड घालून, समन्वय ठेवून काम केले. यात महामार्ग भूसंपादन, मार्केट स्वच्छतेचा विषय, रेल्वेस्थानकाचा विषय या कामांमध्ये यश मिळाले. गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, गुलाबराव पाटील यांच्याह सर्व पदाधिकारी, अधिकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळाल्याने चांगले काम करता आहे. सर्वांशी चांगले संबध राहिले, असे निंबाळकर म्हणाले.

किशोर राजेनिंबाळकर यांची अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती

तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना मंत्रालयात महसूल व वन (मदत व पुनर्वसन) विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याबाबत सोमवारी आदेश काढले.

मेधा गाडगीळ यांची वित्तीय महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागेवर राजेनिंबाळकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, जळगावचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठकही घेतली.

LEAVE A REPLY

*