मुक्ताईनगरसाठी आठ दिवसात पाच कोटी

आ.खडसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत विविध निर्णय

0

जळगाव । मुक्ताईनगर नगरपंचायतीला वैशिष्ट्य पूर्ण कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी आठ दिवसात वितरीत करण्यासह विविध निर्णय सोमवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आले. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांसंदर्भात मंत्रलायात बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव प्रविण परदेशी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

काय झाले निर्णय

उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाच्या स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत विभाजनाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय पशु व मत्स महाविद्यालयाला शासनाने मान्यता दिली असून जागा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्या ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्याठी नागपूर विद्यापीठाची अंतिम शिफारस घेऊन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला. दरम्यान, सावदा, भुसावळ, रावेर व फैजपूर पालिकांच्या हद्दवाढीचा प्रस्तावास येत्या 15 दिवसात मान्यता देण्यात येणार आहे. कोथळी तीर्थक्षेत्र विकासासाठी 9 कोटी रूपये खर्च झाल्यानंतर उर्वरित 16 कोटी रूपये देण्यात येणार आहे.

वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राऐवजी राज्यस्तरीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासह यावल तालुक्यातील हिंगोणा येथे केळीचे टिश्यू कल्चर रोपे तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यास विद्यापीठास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

बोदवड व मुक्ताईनगरच्या जलशुद्धीकरण केंद्रासह पाणीपुरवठा योजनांसंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्तता करून 15 दिवसात मंजुरी देण्याबाबत बैठकीत निर्णय झाला.

सावदा रूग्णालयाच्या इमारत बांधकामांसाठी 12 कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कुर्‍हा वढोदा उपसासिंचन योजनेस अतिरिक्त निधी मिळण्याचा प्रस्तावास मान्यता मिळण्याची विंनंती करण्यात आली असून जिल्ह्यातील अन्य सिंचन प्रकल्पांनाही अधिकचा निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली. बैठकीला आमदार संजय सावकारे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी आदींचीही उपस्थिती होती.

स्वतंत्र कृषी विद्यापीठासाठी विभाजनाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवणार
सावदा, भुसावळ, रावेर व फैजपूर पालिकांच्या हद्दवाढीचा प्रस्तावास येत्या 15 दिवसात मान्यता
वरणगाव येथे राज्यस्तरीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र
हिंगोणा येथे केळीचे टिश्यू कल्चर रोपे तयार करण्याचा प्रकल्प
बोदवड व मुक्ताईनगर पा.पु.योजनेस 15 दिवसांत मंजुरी
सावदा रुग्णालयासाठी 12 कोटींचा निधी

LEAVE A REPLY

*