गांधीजी समजून घेताना कस्तुरबाचे योगदान समजणे महत्त्वाचे- तुषार गांधी

0
जळगाव दि.17 |प्रतिनिधी |  महात्मा गांधीजी समजण्यासाठी आधी मोहनदास यांचे व्यक्तिमत्व समजणे महत्त्वाचे आहे. तसेच गांधीजींच्या ‘मोहन ते महात्मा’ या प्रवासात कस्तुरबा गांधी यांचे योगदान खुप मोलाचे आहे. कस्तुरबाच्या या योगदानाच्या माध्यमातुन महात्मा गांधी समजणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे आयोजीत ‘गांधी समजून घेताना…’ या शिबीरात महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन व आम्ही सारे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ‘गांधी समजून घेताना…’ शिबिराचे उद्‌घाटन दीप्रज्वलनाव्दारे झाले. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, तुषार गांधी, चंद्रकांत वानखेडे, अमर हबीब, अविनाश दुधे उपस्थीत होते.

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहामध्ये दि.16 ते 18 दरम्यान सुरू असलेल्या ‘गांधी समजून घेताना…’ शिबिरात राज्यभरातून सुमारे 100 अभ्यासकांनी भाग घेतला आहे. यात पत्रकार, लेखक, वकिल यासह संशोधक विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. गांधीतीर्थतर्फे ‘बा बापू 150’ या उपक्रमांतर्गत हे शिबिर सुरू आहे. यापूर्वी सेवाग्राम, आगाखान जेल पूणे व मुंबई येथे हे शिबिर झाले आहे. जळगावात हे चौथे शिबीर सुरू आहे.

भविष्यातील गांधी समजून घेताना आपली दिशा काय असली पाहिजे. यावर तुषार गांधी यांनी मार्गदर्शन केले. गांधीजींना समजणे खुप कठिण आहे. महात्मा होण्यासाठी मोहनदास असताना त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या वैचारिक पैलुंचे दर्शन घडते. मानवतावादी दृष्टिकोनातुन गांधी समजणे महत्त्वाचे असुन त्यांचे आचार, विचार प्रत्यक्ष आचरणात आणले तर  जीवन समृध्द होवू शकते, असे तुषार गांधी म्हणाले.

गांधीजींच्या विचारात संस्कारित समाज निर्मिती- अशोक जैन

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उद्देश, भविष्यातील दिशा काय असतील याबाबत मार्गदर्शन करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, गांधीजींच्या विचारात संस्कारित समाज निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळेच गांधीजी समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते. मात्र गांधीजींबाबत सकारात्मक विचार व वास्तववादी घटना समाजापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन संशोधन करीत असुन महात्मा गांधीजी आणि त्यांच्या सोबत असलेल्या समकालीन व्यक्तींवरील एक ग्रंथ भविष्यात प्रकाशित केला जाणार असल्याचेही अशोक जैन म्हणाले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातुन महात्मा गांधी व कस्तूरबा यांच्या 150 व्या जयंती निमित्त आठ राज्यांतुन 150 गावांच्या विकासासंबधी आराखडा तयार करण्यात येणार आहे. यातुन खेडी कशी स्वयंपूर्ण होतील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

‘गांधी समजून घेताना…’ या शिबिरात प्रमूख वक्ते म्हणुन अमर हबीब यांनी गांधी का समजून घ्यायचा?, कुमार शिराळकर यांनी ‘मार्क्सवादी दृष्टीकोनातून गांधी’, सुधाकर जाधव यांनी ‘गांधी आज किती आवश्यक?’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

पहिल्या सत्राचे प्रास्ताविक अविनाश दुधे यांनी करीत जगात अनेक उद्योग समूह असतील मात्र योग्य तंत्रज्ञानाचा वापर करित उत्कृष्ट नियोजनाच्या माध्यमातून गांधी तीर्थ सारखी अप्रतिम वास्तु उभारल्याने जैन उद्योग समूहाचे वेगळे महत्त्व असल्याचे ते म्हणाले. सुत्रसंचलन भुजंगराव बोबडे यांनी केले.

LEAVE A REPLY

*