राशी-आर.सी.एच.६५९ बी.जी. दोनच्या बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट उघड

0

जळगाव |  प्रतिनिधी :  संपूर्ण राज्यात राशी आर सी एच ६५९ बी.जी.-२ वर बंदी आहे. मात्र मध्यप्रदेश आणि गुजराथ येथून यावल, चोपडा, रावेर मार्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री एका रॅकेट कडून होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत रॅकेटचा पर्दाफाश केला. संशयीत आरोपीकडून २८१ बोगस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात बंदी करण्यात आलेल्या राशी बीजी-२ या बियाण्यांची मध्यप्रदेश व गुजराथ मार्ग चोरटी वाहतुक करुन चढ्या भावाने शेतकर्‍यांना विकले जात असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेचे पोनि. राजेशसिंह चंदेल यांना मिळाली.

त्यांनी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांना याबाबत कळविले. पोलीस अधिक्षक कराळे यांनी अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांना आवश्यक त्या सुचना दिल्यात.

अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेशसिंह चंदेल, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, कृषी विभागाचे सुरेंद्र पाटील, पोउनि प्रकाश इंगळे, सफौ. अमोदकर, पोहेकॉ शशिकांत पाटील, पोहेकॉ दिलीप येवले, पोहेकॉ.विजय पाटील, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चौधरी, पोना. रविंद्र वारुळे, नारायण पाटील, सुरेश महाजन, रामकृष्ण बोरसे, रविंद्र चौधरी, कृषी विभागाचे अधिकारी प्रदिप ठाकरे, राशी सीड् प्रा.लि.चे आर. पी. शिरसाठ यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकाने एक डमी ग्राहक तयार केला. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील मांजरोध येथील रहीवाशी जितेंद्र भुरेसिंग जाधव (वय ४५) याच्याशी डमी ग्राहकाने फोनकरुन संपर्क साधला.

३०० राशीच्या पाकीटांची त्याने मागणी केली. बाजारात ८०० रुपये दराने या पाकीटांची विक्री होत असून ६५० रुपयांमध्ये जितेंद्र जाधव यांनी राशी या कपासीच्या बियाणेचे पाकिट देण्याचे ठरविले.

तीन जागा बदलविल्या

जितेंद्र याने डमी ग्राहकाला एकटाच येण्याची तंबी दिली. ग्राहक हा एकटाच येत असल्याची खात्री करण्यासाठी त्याने तीन ठिकाणी जागा बदलविल्यात.

चोपडाजवळील अकुल खेडा जवळ जितेंद्र ताब्यात

जागा बदलवित असलेल्या जितेंद्र याने डमी ग्राहकाला चोपडा पासुन शिरपुर रोडने येण्याचे सांगितले. अकुलखेडा फाट्याजवळ जितेंद्र याने एका पोत्यामध्ये बियाण्यांचे पाकीटे ठेवले होते. हे घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे व कृषी विभागाच्या पथकाने जितेंद्र याला ताब्यात घेतले.

सव्वा दोन लाखाची पाकीटे जप्त

जितेंद्र याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गोणपाठामध्ये २८१ राशीचे पाकीटे सापडलीत. सुमारे २ लाख २४ हजार ८०० रुपयांची पाकिटे पोलीसांनी जप्त केली आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

राशी ६५९ खरेदी करु नये- कृषी अधिकारी

राज्यात राशी ६५९ बीयाणांवर बंदी आहे. त्यामूळे शेतकर्‍यांनी ती खरेदी करु नये. तसेच स्वदेशी ५ देखील अजुन जिल्ह्यात आलेली नाही. त्यामूळे स्वदेशी ५ या बियाण्यांमध्ये बाजारात बनावट बियाणे येण्याची शक्यता असून शेतकर्‍यांनी बीयाणे तपासुन घ्यावे असे आवाहन कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*