लोकांना वाटले पाहिजे आपण एकत्रित आहोत : ना.शरद पवारांच्या पदाधिकार्‍यांना कानपिचक्या; मनपा निवडणुकीबाबत घेतली माहिती

0

जळगाव |  प्रतिनिधी :  आगामी महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटीत राहण्याची गरज असून आपण एकत्र आहोत, असे लोकांना वाटले पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांनी जिल्हा पदाधिकार्‍यांना कानपिचक्या घेतल्या.

अंजिठा विश्रागृहात आयोजित पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ना.पवार बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, माजी खा. ईश्‍वर बाबुजी जैन, माजी खा. वसंत मोरे, जिल्हाध्यक्ष तथा आ.डॉ.सतिष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ.मनिष जैन, माजी आ.राजीव देशमुख, गफ्फार मलिक, रविंद्र पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, अनिल भाईदास पाटील, मिनल पाटील, कल्पना पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना.पवार म्हणाले की, जि.प. निवडणुकीवेळी आपले लोक फुटल्याने सत्ता गेली. येत्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास नक्कीच आपल्या यश येईल. आगामी निवडणुकींच्या नेतृत्वासाठी नवीन चेहरा अपेक्षित आहे. रिक्त असलेल्या महानगराध्यक्षपदासाठी प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा असेही ना.पवार यांनी सांगितले.

ना.पवार पुढे बोलतांना म्हणाले की, येत्या आगामी निवडणुकांसाठी विदर्भापासून दौरा सुरु करणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा दौरा करणार असून दोन दिवस जिल्ह्याला देणार असल्याचे ना.पवार यांनी सांगितले.

सत्ताधार्‍यांनी भरमसाट पैसा खर्च केला

सत्ताधार्‍यांनी जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत भरमसाट पैसा खर्च केल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे आपला उमेदवार मागे पडल्याची खंत ना.पवार यांनी व्यक्त केली.

पक्षात गट-तटचे वातावरण असून आगामी निवडणुकांसाठी ना.पवार यांनी एकच आदेश देवून येत्या निवडणुकांसाठी जिल्ह्यासाठी दोन दिवस द्यावे, अशी मागणी विलास पाटील यांनी केली.

यावेळी काही पदाधिकार्‍यांनी प्रमुख नेते एकत्रित येत नसल्याची खंत ना.पवार यांच्या समोर व्यक्त केली. यावेळी अनिल भाईदास पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून बुथनिहाय संघटन करण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रमुख नेतेच मॅनेज होतात

निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील प्रमुख नेतेचे सोयीचे राजकारण करून मॅनेज होतात असल्याचे सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे सांगून नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली.

मनपा नवडणुकीची घेतली माहिती

ना. पवार यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीची माहिती घेतली. १४ महिन्यांनी जळगाव महानगरपालिकेची निवडणुक असून नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे, असे सांगून तरुण उमेदवारांना संधी द्या, असे प्रमुख नेत्यांना सांगितले.

यावर गफ्फार मलिक यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत पक्षांची अद्याप कुठलीही तयारी झालेली नसल्याचे सांगितले. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी महानगराध्यक्ष व युवक अध्यक्ष पद रिक्त असल्याचे सांगितले. यावर ना.पवार या दोन्ही रिक्त पदासाठी पदाधिकार्‍यांनी आ.सतिष पाटील यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव द्यावा असे सांगितले.

पक्षासाठी पूर्ण वेळ देणार – जैन

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुक लढविणार नसून पक्षासाठी पूर्ण वेळ देण्याची तयारी असल्याचे माजी खा.ईश्‍वरबाबुजी जैन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*