# Blog # पेशवाई मानसिकतेविरुद्धचा लढा ?

0

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरसुद्धा दलितांचे सामाजिक शोषण सुरूच असेल तर ते स्वतंत्र लोकशाही देशाचे सरकार आणि समाज या दोघांच्याही अपयशाचे प्रमाणच मानावे लागेल. या विफलतेला सफलतेत परावर्तीत करण्यासाठी ‘दलित अस्मिते’च्या लढाईला व्यापक स्वरूप द्यावे लागेल.

या लढाईला शोषणाविरुद्धची लढाई बनवावे लागेल. सामाजिक विषमतेला अमानवी स्वरूप देणारे पेशवे चूक होते. मात्र विषय तेथेच थांबत नाही. पेशव्यांच्या या अत्याचाराचे मूक समर्थकसुद्धा ती चूक पुढे चालवत आहेत, असे म्हणावे लागेल. आजही स्थिती फारशी वेगळी नाही. पेशवे-प्रवृत्ती आजही जिवंत आहे आणि चुकीचे मूक साक्षीदार बनण्याची प्रवृत्तीसुद्धा!

पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे दोनशे वर्षांपूर्वी एक लढाई लढली गेली. नुकतीच त्या लढाईची आठवण ताजी केली गेली. यानिमित्त देशभरातून दलित नेते व दलित बांधव तेथे जमले होते. एका अर्थी ही दलित अस्मितेची लढाईच होती. दोनशे वर्षांपूर्वी या मैदानात इंग्रजांनी दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या विशाल सैन्याचा पराभव केला होता.

इतिहासातील वर्णनानुसार हजारोंच्या पेशवाई सेनेपुढे इंग्रजांच्या अवघ्या पाचशे सैनिकांच्या ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रेंट्री’ने बारा तासांची ‘भीषण लढाई’ अशा तर्‍हेने लढली की या लढाईमुळे भारतीय जमिनीवर इंग्रजांचे बस्तान पक्के बसले. म्हणून या लढाईचे महत्त्व असंदिग्ध आहे; पण या लढाईची महत्त्वाची बाजू म्हणजे इंग्रजांकडून लढणारे ते पाचशे सैनिक महार होते. दलित म्हणून पेशव्यांनी केलेल्या जातीय अपमानाचा बदला घेण्यासाठी ही लढाई त्वेषाने लढले होते.

पेशव्यांनी अस्पृश्य मानल्या जाणार्‍या समाजावर क्रूर सामाजिक बंधने लादली होती. इतिहास याचा साक्षीदार आहे. दलितांना कोरेगाव-भीमाची ती लढाई पेशव्यांचा बदला घेण्याची संधी वाटली आणि त्यांनी बदला घेतला.
पेशवे नक्कीच पराभूत झाले होते; पण या पराभवामुळे दलितांबद्दलचा कथित सवर्ण समाजाचा दृष्टिकोन बदलला. तो पेशव्यांपुरता मर्यादित नव्हता.

संपूर्ण देशात दलितांना या भीषण भेदभावाची शिकार व्हावे लागले. दलितांच्या छळवादाच्या कथा देशभर पसरल्या आहेत. दक्षिणेत दलितांची सावली अंगावर पडली तरी या कथित उच्चवर्णीय अपवित्र होत असत. उत्तरेत दलितांना पादत्राणे घालून सवर्णांसमोरून जाता येत नसे. या सर्व जुन्या जमान्याच्या गोष्टी होत्या, असे आता म्हणता येईल; पण दुर्दैवाने आज एकविसाव्या शतकातसुद्धा आपला भारतीय समाज सामाजिक विषमतेच्या चक्रव्यूहातून पूर्ण मुक्त झालेला नाही.

परिस्थिती बदलली आहे हे खरे! स्वतंत्र भारताचे संविधान तयार करणारा शिल्पकार एक दलितच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने देशाला दिलेली राज्यघटना मानवी समानता आणि बंधुतेची हमी देते. तथापि बरेच परिवर्तन आणि सुधारणा होऊनसुद्धा देशात दलितांना माणूस न समजणारी मानसिकता कोणत्या ना कोणत्या रूपाने आजदेखील जिवंत आहे हे वास्तव कोण नाकारणार? मिशा ठेवल्याबद्दल एखाद्या दलिताला अपमानित केले जाऊ शकते.

एखाद्या दलित नवरदेवाची वरात वाजतगाजत जात असेल तर तथाकथित सभ्य समाजाकडून त्याला त्रास दिला जातो. आपल्या घरात दलितांसाठी वेगळी भांडी ठेवणारे काही कर्मठ महाभाग आजही आढळतात.

सामाजिक एकता आणि समतेबद्दल सारेच आवर्जून व भरभरून बोलतात. जातीयवाद पाळणे हा देशात कायद्याने गुन्हा आहे. आजचे राज्यकर्ते आणि नेत्यांमध्ये दलित समाजातील बरेच लोक सहभागी आहेत. तरीसुद्धा जातीयतेचा कर्करोग आमच्या राष्ट्रीय देहात अजून जिवंत आहे.

हा रोग नेहमीच उत्पात घडवतो. आमचे नेते व राजकीय पक्ष जातीय विषमतेविरुद्ध भरभरून बोलतात; पण राजकीय स्वार्थासाठी जातीय समीकरणांचा लाभ उठवणे त्यांना जराही गैर वाटत नाही. आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आपले अस्तित्व आणि आपल्या अस्मितेची लढाई आपल्यालाच लढायची आहे, असे दलित समाजाला आजही का वाटते? स्वत:ची लढाई स्वत:लाच लढावी लागते हे खरे; पण सामाजिक विषमतेची लढाई संपूर्ण भारतीय समाजाने एकजुटीने लढण्यातच तिचे सार्थक आहे.

सामूहिक आणि सामाजिक विचार बदलण्याची ही लढाई आहे. म्हणून कथित सवर्ण आपल्याला समानतेचा अधिकार देणार नाहीत, असे दलितांना आजसुद्धा वाटावे ही लज्जास्पद बाब नव्हे का? सामाजिक समतेची ही लढाई स्वत:ला माणूस समजणार्‍या प्रत्येक नागरिकाची लढाई आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सत्तर वर्षांनंतरदेखील कोरेगाव-भीमा येथील लढाईचे द्विशतक साजरे करणे दलितांना जरूर वाटत असेल तर त्याला सामाजिक विफलता म्हणूनच स्वीकारावे लागेल. संपूर्ण भारतीय समाजाने मिळून हा उत्सव साजरा केला असता तर ती आदर्श स्थिती ठरली असती.

दोनशे वर्षांपूर्वी महार सैनिकांनी पेशव्यांना पराभूत करून सामाजिक भेदभाव आणि अत्याचाराविरुद्ध एक विजयच मिळवला होता. ही मानवी समतेची लढाई होती. मानवतेच्या अस्तित्वाची लढाई होती. अशी लढाई सतत चालू राहिली पाहिजे. तरीसुद्धा १ जानेवारीला पुण्याजवळ ‘विजय पर्व’ साजरे करण्यासाठी फक्त दलित बांधवच जमले होते. मानवी समता आणि एकतेचा अधिकार कोणी कोणाला देणार नाही. हा विजय समाजातील प्रत्येक सदस्याला स्वत: मिळवावा लागेल, ही बाब तेथे अधोेरेखित झाली.

आपल्या देशात व समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर ही लढाई लढवली जात आहे. तथापि समतेची लढाई आकर्षक जुमले आणि घोषणाबाजीपर्यंतच मर्यादित का राहते? ‘सबका साथ, सबका विकास’ची घोषणा असो वा रांगेत उभ्या असलेल्या अखेरच्या माणसाला पुढे आणण्याची थाप, असे पवित्रे नेहमीच राजकीय स्वार्थाची कुस्ती जिंकण्याचे साधन बनतात.

‘मनुवाद’ अथवा ‘ब्राह्मणवादा’च्या विचारांच्या घोषणाबाजीत दलितांच्या खर्‍या समस्या आणि व्यथा मात्र हरवून जातात. असे होऊ नये अथवा ही स्थिती संपुष्टात यावी म्हणून चिंता आणि चिंतन करण्याची गरज आहे. हा काही फक्त दीर्घकाळ उपेक्षित, पीडित आणि शोषित असलेल्यांचाच प्रश्‍न नाही. कोणत्याही प्रकारच्या शोषणाची शिकार होणारे ‘दलित’च म्हणावे लागतील. या शोषणाविरुद्ध प्रत्येक स्तरावर लढाई लढण्याची आवश्यकता आहे.

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरसुद्धा दलितांचे सामाजिक शोषण सुरूच असेल तर ते स्वतंत्र लोकशाही देशाचे सरकार आणि समाज या दोघांच्याही अपयशाचे प्रमाणच मानावे लागेल. या विफलतेला सफलतेत परावर्तीत करण्यासाठी ‘दलित अस्मिते’च्या लढाईला व्यापक स्वरूप द्यावे लागेल. या लढाईला शोषणाविरुद्धची लढाई बनवावे लागेल. सामाजिक विषमतेला अमानवी स्वरूप देणारे पेशवे चूक होते. मात्र विषय तेथेच थांबत नाही.

पेशव्यांच्या या अत्याचाराचे मूक समर्थकसुद्धा ती चूक पुढे चालवत आहेत, असे म्हणावे लागेल. आजही स्थिती फारशी वेगळी नाही. पेशवे-प्रवृत्ती आजही जिवंत आहे आणि चुकीचे मूक साक्षीदार बनण्याची प्रवृत्तीसुद्धा! घोषणाबाजी टाळून दलितांच्या या लढाईला समाजातील शोषित वर्गाच्या हिताची लढाई बनवणे जरूर आहे.

दलितांची लढाई केवळ त्यांची लढाई मानणे म्हणजे एकूणच मानवी अधिकारांच्या लढाईचे महत्त्व न जाणणेच ठरेल. समर्थक व मूक साक्षीदारांना याची जाणीव करून देणेही गरजेचे आहे. दोनशे वर्षांपूर्वी दलित सैनिकांनी पेशव्यांच्या अत्याचाराविरुद्ध एक लढाई जिंकली होती. आज समाजाच्या पेशवाई मानसिकतेविरुद्ध युद्ध जिंकण्याची आवश्यकता आहे. सामाजिक विषमता संपुष्टात आणण्याची ही लढाई सर्वांना मिळून लढवावी लागेल. तेव्हाच खरेखुरे भारतीयत्व उदयास येईल.

विश्वनाथ सचदेव
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)

LEAVE A REPLY

*