# Blog # समांतर रस्त्यांसाठी जळगावकरांवर आंदोलनाची वेळ का यावी ?

0
जळगाव शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर गेल्या काही वर्षात भरधाव वाहनांच्या अपघातांमुळे अनेक निष्पाप दुचाकीचालक मृत्यूमुखी पडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी ते नशिराबाद या दरम्यानचा रस्ता अत्यंत जीवघेणा झाला आहे. त्यामुळे त्यास मृत्यूचा ‘महामार्ग’ म्हणून ओळखले जात आहे.
हा महामार्ग शहराबाहेरून न्यावा, ओव्हरब्रिज बांधावा, रस्ता दुभाजक टाकावे, समांतर रस्ते तयार करावे असे विविध उपाय समोर आलेत. परंतू त्यातील एकाही उपायाची अंमलबाजवणी कर्तव्यदक्ष प्रशासनाने केली नाही. परिणामी महामार्गावर कधी खड्ड्यांमुळे तर कधी भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनांमुळे रोज कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने झालीत.

परंतू प्रशासनाने ’आश्‍वासनांचे’ गाजर दाखवून या आंदोलनांचा फज्जा केला. पण आता मात्र समांतर रस्त्यासाठी सामान्य जळगावकरांची समांतर रस्ते कृती समिती स्थापन झाली आहे. ज्यांना जळगाव शहर आणि शहरातील जनतेची मनापासून काळजी वाटते, आज ‘हे’ तर ‘उद्या’ आपलाही नंबर लागू शकतो या काळजीपोटी ही समिती स्थापन केली गेली.

या समितीतर्फे येत्या १० जानेवारी रोजी महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी १० जानेवारी रस्ता रोको या नावाने तब्बल दोन व्हाटसऍप गृप तयार झाले आहेत. या दोन्ही गृपला सामान्य जळगावकरांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद प्रत्यक्ष १० जानेवारीपासून सुरू होणार्‍या जनांदोलनास मिळावा. गाव करी ते राव काय करी या उक्तीनुसार आता जळगाकरांनी या लढ्यात एकजुटीने उतरून समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा.

या आंदोलनास प्रशासनास सकारात्मक प्रतिसादासोबतच प्रत्यक्ष कामास सुरवात करावी लागेल. जर हे असे नाही झाले तर याचा विपरीत परिणाम महापालिका, विधानसभा यांच्या निवडणूकांवर नाटोच्या रूपाने पडेल हे निश्‍चित. यासोबतच महापालिकेसह इतर शासकीय कर भरण्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता प्रशासनाने वेळीच सावध होत जळगावकरांचा रोष न ओढवता समांतर रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशाच या समितीच्या हस्ते केल्यास तो सर्वांचा विजय होर्ईल…….

चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा एकुलत्या एक मुलगा आदर्श याचा महामार्गावर झालेल्या अपघाती मृत्यूपासून सुरू झालेली मृत्यूची मालिका थांबायचे नाव घेत नाही. यापासून बोध घेत मनाची नसली तरी कर्तव्याची आणि निष्पाप जीवांच्या मृत्यूने जीवाचा आाकांत करणार्‍या नातेवाईकांच्या आक्रोशाची तरी जाण बाळगत प्रशासन आणि महामार्ग प्रशासनाने शहर हद्दीतून जाणार्‍या महामार्गाला समांतर रस्ते तयार करण्याचे काम पूर्ण करावयास हवे होते.

स्पर्धा परिक्षा पास करून क्लास वनची पोस्ट मिळवून देशसेवा, जनसेवा करण्याच्या आणाभाका घेणार्‍या या अधिकार्‍यांना मात्र खुर्ची आणि अधिकार मिळताच कसा विसर पडला कोण जाणे. राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळत स्वत:ची पोळी भाजून घेण्यातच हे अधिकारी धन्यता मानत असल्याचे चित्र तरी सध्या दिसत आहे.

आपण ज्या पदावर काम करत आहोत त्या पदानुसार, पगारानुसार तरी जनतेच्या हिताची कामे करण्याची सुबूध्दी यांना सूचू नये हे जळगावकरांचे दूर्भाग्य. पोटाची खळगी भरण्यासाठी लाखो जळगावकर चोवीस तास विविध ठिकाणी काम करत असतात.

घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या तासाभराचे अंतर पार करण्यासाठी ते स्वत:ची दुचाकी, रिक्षा यासारखे वाहने वापरत असतात. सन २००० पर्यत एस.टी. महामंडळातर्फे शहरासह शहराबाहेर वीस किमी अंतरावर असलेल्या विविध कंपन्यांपर्यंत शहर बस धावत होती. त्यामुळे सर्वजण या शहर बससेवेचा वापर करत. या काळात शहर बसेसच्या पहाटे पाच ते रात्री नऊ पर्यत २०० ते २५० फेर्‍या होत असत. तीन शिफ्टमध्ये ही शहर बस सेवा चालत असे.

… आणि शहर बस सेवा बंद झाली

काळ बदलला, वेळ कमी झाला, परिणामी बसने जाणारा सायकलीने जाऊ लागला, सायकलीने जाणारा दुचाकीने आणि दुचाकीने जाणारा चारचाकीने जाऊ लागला. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सायकली वाढत गेल्यात. परिणामी रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढली. शिक्षणाने आणि शिक्षण न घेऊ शकणार्‍यांचीही संख्या वाढत गेली. त्यात चार पैसे कमवण्यासाठी जिल्ह्याभरातील गावांतून लोक आलीत.

या सर्वांना सामावून घेणारे रस्ते मात्र त्याच लांबीरूंदीचे राहीले. त्यांचा विस्तार करण्यात महापालिकेसह महामार्ग प्रशासनाला कधी सूचलेच नाही. हे कमी की काय या सर्व रस्त्यांच्या साईडपट्ट्यांवर विविध विक्रेत्यांच्या लोटगाड्या उभ्या राहू लागल्या. रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, खड्डेमय झालेले रस्ते, अरूंद रस्ते यासारख्या अनेक कारणांमुळे अपघात होऊ लागले.

अपघात झाल्यानंतर जनमताचा रेटा पाहता लगेच अतिक्रमण काढली गेलीत. आठ दिवसात ही अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झालीत. या गदरोळात एस.टी.च्या बसेसही कालबाह्य होऊ लागल्यात. कालबाह्य झालेल्या बसेस भंगारात काढल्याने बस संख्या कमी झाली. परिणामी वाहतुकीच्या फेर्‍या कमी झाल्यात. दोन बसेसची गर्दी एका बसमध्ये होऊ लागली. बसेसचेही वेळापत्रक कोलमडले. वेळेत पोहचण्यासाठी रिक्षाचा पर्यांय असला तरी त्याचे भाडे जास्त होते. अंतर जास्त असल्याने रिक्षाचालक जात नव्हते.

परिणामी स्वत:चे वाहन घेण्यावाचून जळगाकरांना पर्याय नव्हता. यासारख्या अनेकविध कारणांमुळे एस.टी.ने त्यांची शहर बस सेवा बंद केली.

सार्वजनिक वाहतूक सुविधांचा अभाव

सार्वजनिक वाहतुकीसाठी शहर बस सेवेकडे पाहीले जात असतांना ही सेवाच बंद झाल्याने ती महापालिकेने सुरू करण्याचे सांगण्यात आले. महापालिकेनेही जेएमटीयू नावाने दीड वर्ष ही सेवा दिली. परंतू महापालिकेच्या या करारातील बस उभ्या करण्यासाठी महापालिकेने कोणतीही सुवीधा केली नाही. पर्यायाने या बस रस्त्यावर कोठेही कशाही उभ्या राहू लागल्यात.

महापालिकेची जुनी इमारत, साने गुरूजीं हॉस्पिटलची इमारतीची जागा असतांना ही जागा या बस थांबण्यासाठी देण्यात आली नाही. पर्यांयाने ही बस सेवाही कायमची बदं झाली. आणि महापालिकेतील परिवहन सेवाही कोठे हरवली ती अजुनही सापडली नाही.

रिक्षांसोबत वाहनांचा पर्याय

शहरासह शहरहद्दीबाहेर असलेल्या विविध कंपन्यांमध्ये जाणार्‍या सामान्य जळगावकरांना रिक्षा आणि स्वत:चे वाहन हेच दोन पर्याय राहीले. रिक्षाचा पर्याय निवडला तर दोन टप्प्यात प्रवास करावा लागतो. यात वेळ आणि पैसे दोघेही खर्च होऊ लागले. परिणामी रिक्षांचा पर्याय सोडून स्वत:चे वाहन घेतले गेले. एका वाहनावर दोघे जण जावू लागले.

शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या या महामार्गावरून जाणे क्रमप्राप्त ठरले. महामार्ग असल्याने यावरून जाणारी वाहनेही वेगाने जात होती. रात्री दिवस वाहन चालवणारे चालक मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने या शहर हद्दीतून नेऊ लागली. परिणामी रिक्षा, कार, सायकल, दुचाकी यासारख्या वाहनांना ही मोठी अवजड वाहने चिरूड लागली.

संतप्त जमावाने अपघात करणार्‍या वाहनावर दगडफेक करणे ,वाहन जाळून आपला संताप व्यक्त केला. परंतू यावर पर्याय शोधण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न तेव्हापासूनच्या जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, महामार्ग विभाग, आरटीओ विभागाने प्रभावीपणे केलेले नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करून पुन्हा येरे माझ्या मागल्या नुसार झाले.

आंदोलनाची वेळ का यावी?

जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, महापालिकेचे आयुक्त, महापौर, आरटीओ, महामार्ग (नही) यासारख्या संस्थांवर उच्चशिक्षीत अधिकारी आहेत. तर जनसेवेचा कळवळा असणारे राजकीय नेतेही आहेत. महामार्गाला समांतर रस्ते व्हावेत, रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, अपघात होवू नये, अपघातात प्राण हानी होऊ नये असे सर्वांनाच वाटत असते. परंतू नुसत्या वाटण्याने होत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे.

जेथे समाजाच्या हिताचा विषय येतो तेथे तरी या सर्व घटकांनी कुरघोडी आणि राजकारणाचे जोडे बाजुला सारायला हवेत. मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी होय केवळ रस्त्यांसाठीच २५ कोटी दिले होते. परंतू त्याचे काय झाले हे जळगावकर जाणत आहेत.

प्रशासनही राजकारण्यांची मर्जी सांभाळण्यासाठी ते जसे सांगतील तसे अहवाल तयार करत आहेत. उच्च न्यायालयाने महामार्ग, राज्य मार्गावरील दारूची दुकाने बंद केली होती. पंरतू कर्तव्यदक्ष राजकारणी आणि प्रशासनाने ही दारूची दुकाने वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस करून कागदपत्रे फिरवून हे रस्तेच महापालिकेच्या माथी मारलेत. तोही घोळ अजून चालू आहे.

मात्र न्यायालयाने बंद केलेली दारूची दुकाने जनसेवेचा कळवळा असणार्‍यांनी‘ पत’ पणाला लावून ती ४५ दिवसात सुरू केलीत. तशी ‘पत’ महामार्गाला समांतर रस्ते सुरू करण्यासाठी का लावत नाहीत. हा प्रश्‍न जळगावकराच्या मनात खदखदत आहे.

२५ कोटी, ११६ कोटी, १०० कोटी आणि आता ४४४ कोटी अशी कोटीच्या कोटीची उड्डाणे घेवूनही महामार्गाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात जनसेवेचा वसा घेणार्‍या अधिकार्‍यांना अपयश यावे. हे जळगावकरांचे दुर्दैवच.

जनसेवेच्या वस्याचे सोंग घेवून मतांचा जोगावा मागणार्‍या लोकप्रतिनिधींनीही याचे राजकारण करून जळगावकरांवर सतत मृत्यूची टांगती तलवार, मृत्यूच्या भयाची आणि अनेक माता भगिनींचे कुंकू पूसण्याचा, मुलाबाळांना उघडड्यावर आणण्याचा जणू काही चंगच बांधल्याचे चित्र तरी सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे.

राजकीय नेतृत्वाला नसलेले गांभिर्य तर राजकरण्यांची मर्जी सांभाळण्यात दंग असलेले प्रशासन यामुळे आता स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जळगावकरांनाच लढा देण्याची वेळ आली आहे. त्याची सुरवातही समांतर रस्ते कृती समितीच्या माध्यमातून झाली आहे. एकच ध्येय समांतर रस्ता हे लक्ष घेत १० जानेवारीस अजिंठा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलाने तरी निद्रीस्त आणि जबाबदारी झटकणार्‍या महामार्ग विभागासह प्रशासनास जाग येईल, अशी अपेक्षा बाळगू या. जर या सर्व यंत्रणांना जळगावकरांविषयी आपुलीकी, प्रेम वाटत असेल तर त्यांनी १० तारखेच्या मुहूर्तावरच या समितीच्या सदस्यांकडून समांतर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून तो वेळेत पूर्ण करावा. अन्यथा यापेक्षाही अधिक तिव्र स्वरूपाचे आंदोलन अटळ आहे, हे लक्षात ठेवावे.

 

LEAVE A REPLY

*