Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

देशाचे ऐक्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी तरुणांची : जावेद आनन

Share
जळगाव ता. ४ : आपल्या देशात जातीयतेच्या नावावर अनेक गोष्टी होत असतात. त्यांना बळी पडुन सामाजिक तणाव निर्माण केला जात असतो, अशा वातावरणात तरुणांनी जबाबदारीने वागले पाहिजे, कोणत्याही अमिषाला, बळी न पडता देशाचे ऐक्य अबाधित ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार जावेद आनन यांनी व्यक्त केली.

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पमध्ये ते तरुणांशी संवाद साधत होते. या संवादावेळी जावेद आनन यांनी देशातील विविध ठिकाणी झालेल्या सामाजिक तणावाची उदाहरणांतील वास्तविकता समोर मांडली. त्याचवेळी सर्वसामान्य माणसाला शांतता हवी असते, त्यांना हिंसा नको असते असा मुद्दा अधोरेखित करत जावेद आनन म्हणाले, जेव्हा बाबरी मशीदीची घटना घडली त्यावेळी मुंबई प्रभावित झाले होते, पण त्याचवेळी हरयाणा मध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र नांदत होते.

काशीमध्ये बाबा विश्वनाथची भव्य यात्रा काढली जाते, यात्रेत सहभागी झालेले बाबा विश्वनाथाला (भगवान शंकर) घालण्यात आलेली पगडी हाजी गयासुद्दीन तयार करतात. गयासुद्दीन यांची तिसरी पिढी पगडी तयार करण्याच्या कार्यात सामील झाली आहे. विशेष म्हणजे एक महिना ही पगडी तयार करण्यासाठी लागत असतो. गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळातच ईदचा सण आलेला होता, अशावेळी घाटकोपर येथे एकाच मैदानात गणपतीची स्थापना करण्यात आली होती, तर दुसरीकडे ईदची सामुदायीक नमाजही होत असे.

नुकतेच केरळ येथे वादळ आले होते. त्यात तेथील अयप्पा मंदिरात खुप पाणी आणि घाण साचले होते, ते स्वच्छ करण्याची परवानगी स्थानिक मुस्लिम युवकांच्या एका संस्थेने मागितली होती, मंदिर प्रशासनाने देखील ही परवानगी दिली. देशातील ऐक्याची अनेक उदाहरणे जावेद आनन यांनी दिली. ते पुढे म्हणाले, आपल्या देशात एकाच वेळी आरती, अजान आणि गुरूवाणी ऐकायला मिळते, सर्वधर्मसमभाव जोपासणारं हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे उदाहरण आहे.

सामान्य माणसे शांततेने राहणे पसंत करतात, मात्र काही असामाजिक तत्व समाजाला भडकावण्याचे काम करतात. अशावेळी सावधपणाची भूमिका घेतली पाहिजे. तरुणांनी समाजाचे नेतृत्व करून योग्य गोष्टीला न्याय दिला पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.

या वेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डीन जॉन चेल्लादुराई यांनी प्रास्ताविक केले. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. विनोद रापतवार यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!