उमवी कर्मचार्‍यासह कुटुंबाचा अपघात : पत्नी व मुलीसह अन्य एकाचा मृत्यू; कर्मचारी गंभीर जखमी

0
जळगाव |  प्रतिनिधी :  नाशिक येथील गडकरी चौकात दोन चारचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचार्‍याच्या पत्नी व मुलीसह अन्य एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सारीका लिलाधर भामरे वय ४० व योगिनी लिलाधर भामरे वय १९ रा. विद्यापीठ क्वॉर्टर असे या मयत मायलेकींचे नाव आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील लिपीक लिलाधर भामरे हे गेल्या तीन-चार दिवसापूर्वी आपल्या कुटुंबियांसोबत नाशिक येथे शालकाकडे गेले होते.

त्यानंतर शालकाच्या कुटुंबियांसोबत ते त्र्यंबकेश्‍वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेवून भामरे कुटुुंबिय दि.२५ रोजी रात्री पुन्हा नाशिक येथे आले. त्यानंतर लिलाधर भामरे त्यांची पत्नी सारीका भामरे व मुलगी योगिनी भामरे यांच्यासह लिलाधर भामरे यांचे मेहुणा व त्यांची मेहुणी खाजगी कामासाठी सिन्नर येथे जाण्यासाठी नाशिक येथील अशोक नगर स्टॉपवरून सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास निघाले.

दरम्यान गडकरी चौकात समोरून येणार्‍या भरधाव कारने त्याच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत लिलाधर भामरे यांच्या पत्नी सारीका भामरे, मुलगी योगिनी भामरे यांच्यासह भामरे यांच्या मेहुणीचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात लिलाधर भामरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर धडक देणारा कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

LEAVE A REPLY

*