Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

बोंडअळी, पिकविम्यावरुन आमदारांचा गदारोळ

Share
जळगाव ।  प्रतिनिधी :  जिल्ह्यात बोंडअळीमुळे सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. असे असतांना जिरायतीसाठी अनुदान दिले गेले आणि बागायतीला मात्र दिले नाही. तसेच विमा कंपनी आणि बँकेच्या अधिकार्‍यांमुळे शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळू शकला नाही. अधिकार्‍यांच्या या नाकर्तेपणावर जिल्ह्यातील सर्वपक्षिय आमदारांनी जोरदार प्रहार करीत नियोजन मंडळाच्या सभेत प्रचंड गदारोळ केला.

जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. ए.टी.पाटील, खा. रक्षा खडसे, जि.प.अध्यक्षा ना. उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे, जिल्हा परीषदेचे सीईओ शिवाजी दिवेकर, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जि.प.चे संजय मसकर, नियोजन अधिकारी दिनेश वाघ आदी उपस्थित होते.

बोंडअळी, विम्याचा मुद्दा गाजला

नियोजन समितीच्या सभेत कापसावरील बोंडअळी आणि पिकविम्याचा मुद्दा चांगलाच गाजला. सत्ताधारी पक्षाचे खा. ए.टी.पाटील यांनी बोंडअळीबाबत जिल्ह्यात अत्यंत वाईट परीस्थीती असल्याचे सांगितले. राज्य शासनाने जिरायत आणि बागायत अशा दोघींना अनुदान जाहीर केले आहे. असे असतांना केवळ जीरायती पिकालाच अनुदान दिले जात असल्याचे सभागृहात सांगितले.

यावेळी शिवसेनेचे आ. किशोर पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे आ. डॉ. सतीश पाटील, अपक्ष आ. शिरीष चौधरी, आ. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरीत बैठकीत गदारोळ केला.

पिकविम्याचा लाभच नाही- आ. किशोर पाटील

शेतकर्‍यांनी विम्याचे पैसे भरूनही त्यांना विम्याच्या लाभासाठी अपात्र का करण्यात आले असे सांगत तीव्र संताप व्यक्त केला. ओरीएंटल या कंपनीबाबत अनेक तक्रारी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आ. पाटील यांनी शासनाने हमीभाव जाहीर केला आहे. मात्र जिल्ह्यात खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याचे सांगितले. हे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली.

विम्यासाठी स्वतंत्र बैठक

पिकविम्याचा तिढा सोडविण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि सर्वपक्षिय आमदार यांची विमा कंपनीच्या प्रतिनीधींसोबत आठवडाभरात स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दिले.तसेच पात्र आणि अपात्रतेचे निकष काय आहेत याचाही खुलासा ना. पाटील यांनी सांगितला.

सेंट्रल बँकेच्या मॅनेजरला नोटीस

शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकर्‍याच्या खात्यात आलेले शासकीय अनुदान कर्जखात्यात परस्पर वर्ग केल्याचे सांगितले. याबाबत चौकशी करण्याची मागणीही आ. पाटील यांनी केली. यावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी सेंट्रल बँकेच्या मॅनेजरला नोटीस काढण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले.

सदस्यांना निधी द्या – नंदा पाटील

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन जिल्हा परीषदेच्या सदस्यांना प्रत्येकी 10 लाख रूपयांचा निधी देण्याची तरतूद असतांनाही तो निधी एकाही सदस्याला मिळाला नसल्याचे जिल्हा परीषद सदस्या नंदा पाटील यांनी सांगितले. तसेच वरणगावचे नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी देखिल पालिका सदस्यांनाही समान निधी द्यावा अशी मागणी केली.

त्यावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना जाब विचारला असता सदस्यांना निधी देता आला नसल्याचे सांगितले. नियोजन समितीच्या सदस्यनिहाय निधीचे वाटप करण्याचे आदेश पालकमंत्री ना. पाटील यांनी दिले.

ट्रान्सफार्मर पुन्हा तापले

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आज देखिल महावितरणच्या ट्रान्सफार्मरचा मुद्दा चांगलाच तापला. सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात किती ठिकाणी ट्रान्सफार्मर बदलवायचे आहेत असा प्रश्न उपस्थित केला. महावितरणचे अधिकारी शेख यांनी जिल्ह्यात 221 ट्रान्सफार्मर बदलवायचे असल्याचे सांगितले. मात्र हे ट्रान्सफार्मर बदलविल्यानंतर त्याला लागणारे ऑईलच महावितरणकडे उपलब्ध नसल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सभागृहात उघड केले. आ. किशोर पाटील व आ.डॉ. सतीश पाटील यांनी देखिल ट्रान्सफार्मरच्या मुद्यावरून अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून ऑईल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदारांना दिले.

बंदीस्त पाईपलाईनसंदर्भात मुंबईत बैठक

वाघुर धरणावरून बंदीस्त पाईपलाईनचे काम सुरू झाले होते. मात्र सुजदे आणि नांद्रा येथील दहा ते बारा नागरीकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल देऊन काम सुरू करण्यास सांगितले. तरी अधिकार्‍यांनी काम का सुरू केले नाही? असा जाब विचारला. 35 गावांचा बळी घेणार का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात मुंबई येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. डॉ. सतीश पाटील यांनी जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमानाविषयी मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. असे असतांना नजर आणेवारीत जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ही 50 पैशांच्या वर आहे. अंतीम आणेवारी जाहीर होण्याआधी जिल्हा दुष्काळी जाहीर करावा असा ठराव आ. डॉ. सतीश पाटील यांनी मांडला. तसेच भुसावळचे आ. संजय सावकारे यांनी या ठरावाला सर्वपक्षिय आमदारांनी पाठींबा दिला. ठरावासंदर्भात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, अंतीम आणेवारीनंतर शासनाकडुन दुष्काळाविषयी निर्णय होणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!