मापात पाप : पेट्रोल पंपावर कारवाई : श्रीकृष्ण सर्वो सेंटरची वजनमाप विभागाकडून तपासणी ; कमी पेट्रोल भरल्याने गोंधळ

0
जळगाव |  प्रतिनिधी :   पेट्रोलपंपाच्या मशीनमध्ये चिप लावुन पेट्रोल, डिझेलची विक्री होत असतांनाच आज शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील कंजरवाडा चौकातील इंडियन ऑईल कंपनीच्या श्रीकृष्णा सर्वो सेंटर पंपावर पेट्रोल विक्री दरम्यान मापात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारामुळे पेट्रोलपंपावर काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. वजनमाप विभागाकडून श्रीकृष्ण सर्वो सेंटरची तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे. शेख इरफान शेख गफ्फार यांचे आंबेडकर मार्केटमध्ये ऑटो रिक्षा दुरूस्तीचे गॅरेज आहे.

त्यांच्याकडे गोविदा भोई यांनी त्यांच्या मालकीची रिक्षा दुरूस्तीसाठी आणली होती. इंजिनचे काम असल्याने शेख यांनी भोई यांना ३० रूपयांचे बाटलीत पेट्रोल आणण्यास सांगितले होते. त्यांनी श्रीकृष्ण सर्वो पंपावर बाटलीत तीस रूपयांचे पेट्रोल भरले. शंका आल्याने त्यांनी पुन्हा दुसर्‍या बाटलीत पांडे डेअरी चौकातील पंपावर बाटलीत तीस रूपयाचे पेट्रोल घेतले.

या दोन बाटलीत पेट्रोलच्या मापात घोळ दिसला. नंतर पुन्हा श्रीकृष्ण सर्वोमध्ये पेट्रोल बाटलीत भरले. वेगवेगळ्या मापात पेट्रोल कमी मिळाल्याच्या प्रकाराने येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास गोंधळ झाला.

अनेक नागरिकांनी येथे गर्दी केली. तर काहींनी पंपाच्या मशिनमध्ये चिप असल्याचे सांगितल्याने संशय बळावला. घटनेची माहिती मिळताच वजनमाप निरीक्षक सी.डी.पालीवाल, निरीक्षक अनंत पाटील यांनी श्रीकृष्ण सर्वो सेंटरच्या पंपावर धाव घेतली.

त्यांनी दोन ते तीन वेळा पाच लिटर पेट्रोलच्या मापाची खात्री केली. वेगवेगळ्या मशिनमधून घेतलेल्या पेट्रोलच्या नमुन्यात पाच लिटरच्या मापात २० मिलीलीटर तसेच ३० मिलीलीटर पेट्रोल कमी मिळत असल्याचे या तपासणीत समोर आले.

वारंवार मोजमाप करून प्रशासनाने खात्री करून घेतल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकाने तक्रार केल्यानंतर पंपावर विक्री थांबविणे आवश्यक होते, असे मत दुकाननिरीक्षकांनी व्यक्त केले.

तपासणीत मापामध्ये तफावत दिसून आल्याने पंप सील करून पंप चालकास नोटीस दिली जाईल तोपर्यंत पंप बंद असेल.पंप चालकाने गुन्हा मान्य केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करून पंप सुरू होऊ शकेल, अशी माहिती वजनमाप निरीक्षक सी.डी.पालीवाल यांनी दिली.

LEAVE A REPLY

*