चाळीसगावात वादळीवार्‍यासह पाऊस

0

चाळीसगाव, | प्रतिनिधी  :  चाळीसगाव शहरात गुरुवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वारा वादळासह जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट झाला.तर अनेक ठिकाणी पत्रे उडाली तर झाडेही उन्मळून पडली.

बाजार समितीत मक्याचे पाच हजार पोते ओले झाले. तर ११ नंबर शाळेच्या पटांगणावर पालिका कर्मचार्‍यांची पत्र्यांची घरे उडाली. रोेहिणी नक्षत्राच्या आदल्या दिवशी झालेल्या पावसाने पावसाळ्याची चाहूल दिली.

वीज वाहिनीवर तसेच शेजारी असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीतील घरांवर पत्रे उडाल्याने संपूर्ण चाळीसगावातील वीज प्रवाह सायंकाळी पाच वाजेपासून ठप्प झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

या पावसाने सायंंकाळी जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी ८ वाजेपासून कडाक्याचे ऊन होेते. प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी ३.३० वाजता अचानक वातावरणात बदल होऊन सावली आली. ४.३० वाजता अंधार होऊन आला. अन् वारावादळ सुरू झाले.

सोबत पावसानेही हजेरी लावली. १० मिनिटातच पावसाने जोर वाढविला. जवळपास तासभर चाळीसगाव शहरात दमदार पाऊस सुरू होता. सोबत वादळही वेगात होते. त्यामुळे त्रेधातिरपीट उडाली.

पावसापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण धावपळ करू लागला. अचानक आलेल्या पावसाने व्यापारी पेठेत धावपळ झाली. या पावसाने अनेक नाले वाहू लागले.सखल भागात पाण्याचे तळे साचले.

व्यापारी संकुलांमध्ये पाणी साचले. भडगाव रोड, स्टेशन रोड, घाट रोड, करगाव रोड आदी भागात झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

चाळीसगाव येथे फुले कॉलनी स्थित नगरपरिषद ११ नंबर शाळेच्या पटांगणावर स्थलांतरित नगरपरिषद वसाहत कर्मचार्‍यांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. कर्मचारी कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेली पत्र्याची घरे वादळाने उखडून शेजारी राहत असलेल्या घरांवर जाऊन पडलीत.

सुदैवाने या घरात रहिवास नसल्याने यात कुणाला इजा झाली नाही. तहसीलदार कैलास देवरे, माजी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका संगीता गवळी, नगरसेवक शेखर देशमुख, बंटी ठाकुर यांनी घटनास्थळी भेट दिली.

बाजार समितीत मक्याचे नुकसान

चाळीसगाव बाजार समितीत पावसाचा सर्वाधिक फटका बसला. तेथे मक्याची पाच हजार पोते उघड्यावर होेती. हा सर्व मका व्यापार्‍यांचा होता. तर शेतकर्‍यांचा मोजून ठेवलेला मका शेडमध्ये असल्याने त्यांचे नुकसान टळले.
मक्याची पोते झाकण्यासाठी व्यापार्‍यांची प्रचंड धावपळ उडाली.

काही मका बाहेर पोत्याबाहेर काढून ठेवला होता. तो पाण्यात भिजला. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बाजार समितीत सर्वत्र पाणी साचले होेते.

ग्रामीण भागातही हजेरी

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, चिंचगव्हाण, टाकळी प्र.चा., ओेझर, कळमडू, खडकीसिम, वडाळा वडाळी, वाघळी, उंबरखेडे आदी गावांमध्येही पावसाने हजेरी लावली.सोबत वारावादळही होते. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून त्याच्या कामावर या पावसाने परिणाम झाला.

LEAVE A REPLY

*