वादळासह विजांचा कडकडाट खान्देशात तिघांचा मृत्यू

0

जळगाव : वादळासह विजांचा कडकडाट झाल्याने खान्देशात तीन जणांचा मृत्यू झाला असून मान्सूनपूर्व पावसाचा तडाखाही बसला आहे. दि.२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेच्या सुमारास जळगाव व धुळे जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

वालखेडा, ता.शिंदखेडा शिवारात वादळामुळे वीजेची तार तुटून शेतात निंबाच्या झाडाखाली खेळत असलेल्या दोन बालकांच्या अंगावर पडली. त्यामुळे दोघांना विजेचा धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

तर चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे बोंबील विक्रेता शब्बीर खान सांडेखॉ पठाण हा बाजार करून सायकलने घराकडे जात असतांना त्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याने खान्देशात तिघांचा विज पडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चाळीसगाव तालुक्यात वादळवार्‍यासह पाऊस पडल्याने जनजिवन विस्कळीत झाले. यावल तालुक्यातील दहिगावात अनेकांची घरावरील पत्रे उडाली तर, पुनगावात वादळीवार्‍यासह पावसाचे आगमन झाले.

दरम्यान, धुळे व शिंदखेडा तालुक्यात आज वादळ झाले तर काही ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्याच्या तापमानाचा पारा आज ४३ अंशावर स्थिरावला होता.

दिवसभर प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता, परंतु सायंकाळी साडेपाच वाजेनंतर वातावरणात बदल झाला. धुळे व शिंदखेडा तालुक्यात वादळ झाले. या वादळामुळे काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले तर लग्नसमारंभासाठी उभारण्यात आलेला मंडपही वादळामुळे कोसळून पडला.

वालखेडा, ता.शिंदखेडा शिवारात आज सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळ झाले. या वादळामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. वालखेडा शिवारात सुरेश पाटील यांच्या मालकीच्या शेतात निंबाच्या झाडाखाली ममता मदन पावरा (वय ७) आणि संजय संतोष पावरा (वय १०) हे दोघेजण खेळत असतांना त्यांच्या अंगावर विजेची तार पडली.

त्या दोघांना विजेचा धक्का बसला. दोघे जण गंभीररित्या जळाले. दोघा जळीतांना नरडाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी ममता आणि संजय या दोघांना मृत घोषित केले.

मे हिटचा तडाखा जाणवत असतानाच मेच्या दुसर्‍या आठवड्यात शहरात बेमोसमी पाऊस झाला होता. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा वादळाचा तडाखा धुळे आणि शिंदखेडा तालुक्याला बसला. यात पुन्हा लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

चिंचगव्हाण येथे वीज पडून एक ठार

मेहुणबारे – येथून जवळच असलेल्या चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) येथे वीज अंगावर पडून शब्बीर खान सांडेखॉ पठाण (वय ५०) हा इसम ठार झाला. ही घटना गुरूवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. चिंचगव्हाणसह परिसरात वारा वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सोबत विजांचा कडकडाटही सुरु होता.

मयत शब्बीर खान यांचा बोंबील विक्रीचा व्यवसाय असून ते लोंढे येथील बाजार करुन सायकलने पून्हा चिंचगव्हाणकडे येत होते. रस्त्यावर नऊ नंबर चारीजवळ अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

पुनगांव परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस पुनगांव- परिसरात सायंकाळी ५ वाजे दरम्यान वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. वार्‍यामुळे अनेक झाडे व फांद्या कोलमडुन पडल्या. तसेच घरांची पत्रे उडाली. झाडे पडल्याने गावातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. त्या गावकर्‍यांना रात्र अंधारातच काढावी लागणार आहे.

लाईट बंद झाल्याने कोल्ड ड्रिंक ज्युसच्या दुकान दारांचे मोठे नुकसान होत आहे. मेघ गर्जनेसह पाऊस पडला सायंकाळी सव्वा सहा वाजे पर्यंत मेघगर्जनासह पावसाची रिपरिप सुरुच होती. पावसामुळे परिसरात गारवा जाणवु लागला असुन उकाळ्या पासुन व उन्हा पासुन दिलासा मिळाला आहे.

दहिगांवात घरांवरील पत्रे उडाली

दहिगांव ता. यावल-येथील व परिसरात वादळी पावसाने अनेकांच्या घरांवरील तसेच गुरांच्या गोठ्यावरील पत्रे उडुन अत्यावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. आज दि.२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेचे सुमारास वादळी पाऊस झाला.

यात सावखेडासिम रस्त्यालगतच्या वस्तीतील तसेच सुरेश आबा नगरातील खळवाडीतील पत्रे उडालीत. सुदैवाने प्राण हाणी टळली. वाळत टाकलेल्या मका उत्पादक भुईमुंग उत्पादकांची तारांबळ झाली. सावखेडासिम, विरावळी, कोरपावली, महेलखेडी, येथेही वादळी पाऊस झाला.

LEAVE A REPLY

*