नाथाभाऊ मंत्री असते तर अन्याय झाला नसता

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेले २५ कोटीचा निधी प्राप्त झाल्यानंतर कामे मनपा की, सार्वजनिक बांधकामाच्या विभागातून करावी, यासाठी तिढा निर्माण झाला होता. हा तिढा सुटल्यानंतर विकास कामांची यादी करण्यात आली. परंतु या यादीत भाजप नगरसेवकांच्या वॉर्डातील कामे न घेतल्यामुळे तसेच त्यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे नाराजी नाट्य सुरु झाले असून २५ कोटीच्या निधीला आधीपासूनच ग्रहण लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

दरम्यान माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे हे मंत्रीमंडळात असते तर आमच्यावर अन्याय झाला नसता अशी भावना देखील भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत व्यक्त केली.

महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे विकास कामे खुंटली आहेत. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री जळगावात आले असता. विकास कामांसाठी २५ कोटीची त्यांनी घोषणा केली होती. घोषणेनंतर तब्बल दोन वर्षांनी निधी प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकाम की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामे करावी.

याबाबत तिढा निर्माण झाला. अखेर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन कामे मनपाने करावीत असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधीतील कामांचे विभाजन करुन यादी तयार करण्यात आली. परंतु भाजप नगरसेवकांच्या वॉर्डातील विकास कामांचा समावेश नसल्याने भाजप नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

याबाबत सायंकाळी १६ व्या मजल्यावर भाजप नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी सुनिल माळी, पृथ्वीराज सोनवणे, रविंद्र पाटील, उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, नितीन पाटील, अतुलसिंह हाडा, पिंटू काळे, श्री.बाविस्कर उपस्थित होते. बैठकीत भाजप नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कामे का घेतली नाही? असा सवाल उपस्थित करुन संताप देखील व्यक्त केला.

आज पुन्हा बैठक

भाजप नगरसेवकांची  दि.८ रोजी दुपारी ४ वाजता आ.राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यावेळी विकास कामांच्या यादीबाबत आणि पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

महासभेत आयत्यावेळी गठीत केलेल्या समितीवर नाराजी

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटीच्या निधीतून विकास कामे निश्‍चित करण्यासाठी महासभेत आयत्यावेळी समिती गठीत करण्याचा निर्णय देण्यात आला. या समितीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते यांचा समावेश आहे. आयत्यावेळी गठीत करण्यात आलेल्या समितीबाबत देखील भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*