सीईओ दिवेगावकरांच्या खुर्चीला हार

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या मासिक बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी बैठकीवेळी त्यांच्या खुर्चीला हार घालून त्याच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जलव्यवस्थापन समितीची सभा सीईओ नसल्याने तहकुब करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक अध्यक्षा ना. उज्वला पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित सानेगुरुजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परंतू या बैठकीला सीईओ कौस्तुभ दिवेगावकर अनुपस्थित राहिल्याने सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी जलव्यवस्थापन समितीचे सदस्य पवन सोनवणे व रोहन पाटील यांनी सीईओ यांच्या सभागृहातील खुर्चीला हार घातला.

आतापर्यंतच्या तीन बैठका तहकुब
जलव्यवस्थापन समितीची दि.9 एप्रिल, 21 जुन व आजची तिसरी बैठक विविध कारणावरुन तहकुब करण्यात आली आहे. सीईओ नसल्याने तसेच बैठक तहकुब करण्यात आल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे सदस्यांनी सांगितले.

स्थायी समितीची आज सभा
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा उद्या दि.8 रोजी दुपारी 2 वाजता सानेगुरुजी सभागृहात अध्यक्षा ना. उज्वला पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान बैठकीत निधी खर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

सहापैकी एकाच बैठकीला सीईओ उपस्थित
जलव्यवस्थापन समितीच्या स्थापनेनंतर आतापर्यंत आठ महिन्यात घेण्यात आलेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सहा बैठकांपैकी एकाचा सभेला सीईओ दिवेगावकर उपस्थित राहिले आहे. बैठकीला सीईओ उपस्थित राहत नसल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्या उपस्थितीत आतापर्यंतच्या बैठका घेण्यात आल्या आहे. आज देखील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर उपस्थित होते. परंतू सदस्यांनी सीईओ नसल्याने बैठक तहकुब करण्याचे ठरविले.

जि.प सदस्याचे सीईओंना पत्र
गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यामुळे या कामकाजावर परिणाम होवून जिल्हा परिषदेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने आंदोलनकर्त्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काय कारवाई करण्यात आली तसेच त्यांचे दोन दिवसाचे वेतन कापणार आहे का? व दोन दिवसाची सेवा खंडीत करणार आहेत का? आंदोलनकर्त्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी याबाबत अध्यक्षा यांच्याकडे कुठलीही तक्रार केलेली नाही. यामुळे या आंदोलनकर्त्यावर काय कार्यवाही करण्यात येणार आहे याबाबतची माहितीचे पत्र जि.प.सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

*