पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी जलगाववाला यांचे कार्य प्रेरणादायी

0

जळगाव । देशातील वाढत्या प्रदुषणाच्या समस्येसह वन्यजीव आणि मानवातील वाढता संघर्ष लक्षात घेता पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्‍यांसमोर आव्हान उभे ठाकले असून लिमजी जलगाववाला यांचे कार्य पर्यावरण प्रेमींसाठी मार्गदर्शक ठरु शकते.

जलगाववाला यांनी आपले आयुष्य पर्यावरणासाठी अर्पण केले. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास पर्यावरणीस समस्या सुटण्यास हातभार लागेल असे प्रतिपादन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

कांताई सभागृहात वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आणि पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवार 7 रोजी पार पडला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन अशोक जैन बोलत होते. प्रसंगी मंचावर केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे अध्यक्ष भरत अमळकर, महापौर ललित कोल्हे, डॉ. गोविंद मंत्री, राजेंद्र नन्नवरे, सदाशिव महाजन उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यावरण संस्थेचे राजेंद्र नन्नवरे यांनी केले.

यावेळी पुढे बोलताना अशोक जैन म्हणाले की, लिमजी जलगाववाला हे पर्यावरणवादी होते. त्यांनी 1400 एकर परिसरात 110 पक्षी, 20 ते 25 प्राणी, विविध प्रकारची वृक्षे, औषधी वनस्पती यांचा अभ्यास करुन त्याची माहिती संकलित केली होती. लवकरच ती पुस्तकरुपात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पर्यावरण आणि विकासात समन्वय हवा
देशात पर्यावरण आणि निसर्ग क्षेत्रात ज्या चळवळी निर्माण होत आहे. त्या देश, काल आणि धर्म निरपेक्ष असाव्यात यातील अतिरेक मानवाच्या मुळावर उठत असून यात परस्पर समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केले.

ते म्हणाले की, सध्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. मात्र राज्यात बिबट्यापेक्षाही कुत्र्यांच्या चाव्यामुळे साडेचार हजार जणांना प्राण गमवावे लागले. सर्पदंशानेही मरण पावणार्‍यांची संख्या हजारावर आहे. रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या फांद्या पडून झालेल्या अपघातात सुध्दा नागरिकांना जीव गमवावा लागला.

पर्यावरणासाठी झाडे आवश्यक आहेत. मात्र पर्यावरण आणि प्राणी प्रेमाचा अतिरेक मानवतेच्या मुळाशी उठायला नको, त्याचप्रमाणे मानवताही पर्यावरणाच्या मुळावर उठायला नको या दोघांत समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. महापौर ललीत कोल्हे यांनी वसुंधरा चित्रपट महोत्सवास शुभेच्छा देत पर्यावरण चळवळीसाठी कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

यांचा झाला सत्कार
पुरस्कार प्रदान सोहळ्यात शाहीर शिवाजीराव पाटील यांचा लिमजी जलगाववाला वसुंधरा सन्मान पुरस्कराने तर बाळकृष्ण देवरे, इम्रान तडवी, अजय पाटील यांचा लिमजी जलगाववाला वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. वसुंधरा ग्रीन टीचर पुरस्कार सुनिता महाजन, अनिल माळी, विशाल सोनकुळ, राहुल सोनवणे, प्रशांतराज तायडे यांना देण्यात आला. वसुंधरा संस्था पुरस्कार जळगाव फर्स्ट संस्थेचा मिळाला. तर डॉ. रेखा महाजन यांना वसुंधरा निसर्ग पर्यटन विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर ‘टेंपल ऑफ टाइगर्स : हॅरी मार्शल’ चित्रपटाचे उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*