राजकीय फायद्यासाठीच भाजपाकडून गळ घालण्याचा प्रयत्न

0

जळगाव । पाचोरा-भडगाव तालुक्यात भाजपाची ताकद वाढावी या राजकीय फायद्यासाठीच मला गळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी आ. दिलीप वाघ यांनी आज एका पत्रकार परीषदेत केला.

राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ यांच्या भाजपा प्रवेशाविषयी काही दिवसांपुर्वी चर्चेचे पेव फुटले होते. खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याशीही भेट झाल्याची चर्चा होती.पक्ष प्रवेशासाठी त्यांना तब्बल पाच कोटी रूपयांची ऑफरही देण्यात आली होती.

खा. ए.टी.पाटील यांच्या माध्यमातुन त्यांचा भाजपा प्रवेश होणार होता. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील व वरीष्ठ नेत्यांनी माजी आ. वाघ यांच्याशी चर्चा करून या प्रवेशाला ब्रेक लावला होता.

आज राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परीषदेत माजी आ. दिलीप वाघ यांना भाजपा प्रवेशाविषयी प्रश्न उपस्थीत केला असता त्यांनी सांगितले की, पाचोरा-भडगाव तालुक्यात भाजपाची ताकद कमी आहे.

शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपाला त्याठिकाणी वजनदार नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी आणि ना. गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात येणार्‍या पाचोरा गटातील काही गावे सेफ करण्यासाठीच मला पक्ष प्रवेशाची गळ घालण्यात आली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

माजी आ. कै. ओंकारआप्पा वाघ यांनी विकासाच्या मुद्यावर एकवेळा सहकार्य केले होते. त्यामुळे आमचे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहे.

असे असले तरी भाजपच्या राजकीय फायद्यासाठी कधीही प्रवेश करणार नसल्याचे माजी आ. दिलीप वाघ यांनी सांगितले. तसेच पैशांची कुठलीही ऑफर देण्यात आली नव्हती असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*