अनिल चौधरींची तापी पट्टयात चाचपणी

0

जळगाव । विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी बाकी असला तरी इच्छूक
उमेदवारांच्या व्यूहरचनेला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्ष, दीडवर्षापासून अंजनी-बोरी पट्यात रणनिती आखणारे भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे युवा नेते अनिल छबिलदास चौधरी यांनी गेल्या दोन महिन्यापासून तापी पट्ट्यात मोर्चा वळविला आहे. चौधरी यांची रावेर मतदारसंघात भ्रमंती सुरु झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघासाठी त्यांना हिरवा कंदिल मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भुसावळ येथील भाजपाचे युवा नेते अनिल चौधरी यांची नाळ गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांशी जुळलेली आहे. मोठे बंधू संतोष चौधरी यांनी भुसावळ विधानसभेची धुरा एक पंचवार्षिक सांभाळली आहे. त्यांचा नगरपरिषदेतील व आमदारकीतील कार्यकाळ भुसावळसह परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यास कारणीभूत ठरला आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना खंबीर साथ देणारे त्यांचे बंधू अनिल चौधरी यांचे संघटनकौशल्य लपून राहिलेले नाही.

परिस्थिती कोणतीही असो, निर्णय कोणताही असो, नेहमी धाडसीवृत्तीने निर्णय घेत, संघर्ष करत वेळप्रसंगी कठोर भूमिका घेत त्यांनी नेहमी विकासाच्या दिशेनेच वाटचाल केली आहे. दूरदृष्टी असलेले अनिल चौधरी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष अशी पदे भूषवून राजकारणात व समाजकारणात वेगळा ठसा उमटविला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपा अशा तीन पक्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनिल चौधरी यांनी सुरुवातीला पारोळा-एरंडोल मतदारसंघात चाचपणी केली. गेल्या वर्षभरापासून त्यांनी एरंडोल मतदारसंघ पिंजून काढला. मात्र अनेक कारणांची मिमांसा करुन तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय करुन श्री.चौधरी यांनी एरंडोल मतदारसंघ सोडून भुसावळलगत असलेल्या रावेर मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे.

गेल्या महिनाभरापासून त्यांनी मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठींचा धडाका लावला आहे. अलिकडेच फैजपूर येथे झालेल्या महाआरोग्य शिबिराच्या आयोजन-नियोजनापासून ते यशस्वीतेपर्यंत त्यांनी परिसराशी ठेवलेला संपर्क महत्त्वाचा ठरला आहे. भुसावळहून रावेर मतदारसंघ जवळ असल्याने तात्काळ संपर्कही साधता येत आहे. त्याचप्रमाणे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी ते सततचा संपर्क करत आहेत.

त्यांच्या या संभाव्य उमेदवारीचा धसका भाजपातील इच्छुक अनेक स्थानिक पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. हरिभाऊ जावळे विद्यमान आमदार असतांना अनिल चौधरी यांना भाजपा उमेदवारी देईल का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आ.जावळे यांनी खासदारकी व आमदारकी भूषविली असल्याने ते पक्षातील ज्येष्ठ नेते झाले आहेत.

त्यामुळे त्यांना पक्ष पदोन्नती देवू शकतो. त्यांच्या कामांचा अनुभव व ज्येष्ठता पाहता त्यांच्यावरील कामाची जबाबदारीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच की काय अनिल चौधरी यांना रावेर मतदारसंघासाठी वरिष्ठांनी हिरवा कंदिल दिल्याचे समजते.

स्थानिक भाजपाचे अनेक पदाधिकारी आमदारकीसाठी इच्छुक असतीलच, असे असतांना भुसावळ येथील अनिल चौधरी मात्र रावेर मतदारसंघात भाजपाची उमेदवारी मिळेल या आशेवर दीडवर्ष आधीच पायाभरणी करत आहेत. त्यांची ही पायाभरणी कशाच्या आधारावर आहे हे अनाकलनीय आहे. स्थानिक उमेदवार की बाहेरील उमेदवार अशी अनेकवेळा चर्चा होते.

मात्र काम करणार्‍या व्यक्तीला पक्ष प्राधान्य देत असल्याने यात अनिल चौधरी सरस ठरतील असा कयासही राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जाणारे जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्याशी अनिल चौधरी यांची असणारी मैत्री सर्वश्रृत आहे.

येत्या दीड ते दोन वर्षात रावेर मतदारसंघ पिंजून काढून गोरगरिबांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात भेटींचा धडाका लावला आहे. त्यांचा रावेर मतदारसंघातील प्रवेश अनेकांना बुचकळ्यात टाकणारा तर स्थानिक इच्छुकांची झोप उडविणारा ठरला आहे. अनिल चौधरी सध्या रावेर मतदारसंघात गावोगावी फिरुन मतदारांशी चर्चा व चाचपणी करत आहेत. त्यांची काम करण्याची कुशलपद्धती माहिती असल्याने मतदारही त्यांना प्रतिसाद देत आहेत.

निवडणुकीला बराच कालावधी असला तरी आतापासूनच उडत असलेला हा धुराळा अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. श्री.चौधरी यांची उमेदवारी कोणासाठी फायद्याची आणि कुणासाठी तोट्याची हे येणारा काळच सांगेल. त्यांना स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांची साथ मिळेल काय? मतदारसंघ बदलवून राजकीय वर्तुळात आकर्षणाचे केंद्रबिंदू राहणार्‍या चौधरींसाठी विधानसभेचे दरवाजे उघडतील काय? याविषयी चर्चा होत आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनिल चौधरी यांनी रावेर परिसरात अतिशय काटेकोर नियोजनातून विधानसभेसाठी तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी गावोगावी फिरुन मतदारांशी थेट संपर्क साधला. मात्र इकडे भुसावळमध्ये मोठे बंधू संतोषभाऊ चौधरी यांनी सूचविलेले उमेदवार संजय सावकारे यांना निवडून आणण्यासाठी अनिल चौधरी यांना रावेर परिसरातून माघार घ्यायला लावली व भुसावळ मतदारसंघाची जबाबदारी सोपविली.

गेल्यावेळी रावेरमधून माघार घेतली असली तरी आता ते लढण्यावर ठाम असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. भाजपाची उमेदवारी मिळेल असा हिरवा कंदिल पक्षश्रेष्ठींतर्फे त्यांना दिल्याचे बोलले जात आहे. मात्र ऐनवेळी भाजपाचे तिकीट मिळाले नाही तरी अन्य कोणत्याही पक्षातर्फे किंवा अपक्ष निवडणूक लढविण्याची त्यांची रणनिती असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

*