आदर्श तलाठ्याचा लाचखोरीचा प्रताप उघड

0

जळगाव । महसूल प्रशासनात आदर्श तलाठी म्हणून चक्क पालकमंत्र्यांकडून गौरविण्यात आलेल्या जळगाव शहर सजाचे तलाठी फिरोज खान यांचा लाचखोरीचा प्रताप आज उघड झाला. दरम्यान या तलाठ्याच्या बचावासाठी रात्री उशीरापर्यंत संघटनांची मोर्चेबांधणी सुरु होती.

केंद्र व राज्य सरकारकडून भ्रष्टाचाराला पायबंद करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र बांधकाम, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, पोलिस डिपार्टमेंट, जिल्हाधिकारी कार्यालय या सर्वच विभागांमध्ये सर्रास लाच घेण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे.

जळगावच्या महसूल प्रशासनात देखील लाचखोरीचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्या तुलनेत मात्र लाच घेणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर हवी तशी कारवाई प्रशासनाकडून केली जात नसल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.

गतवर्षी जिल्हा प्रशासनाने महसूल कामकाजात उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव केला होता. यात जळगाव शहर सजाचे तलाठी फिरोज खान यांना देखील आदर्श तलाठी म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळाहून फिरोज खान हे जळगाव शहर सजाचे काम पाहत आहेत. कुंभार समाजातील वीटभट्टी व्यवसायिकांना दाखला देण्यासाठी 1800 रुपयांची लाच घेतांना फिरोज खान यास अटक करण्यात आली.

ज्या कर्मचार्‍याला आदर्श तलाठी म्हणून पुरस्कार मिळाला, त्याच कर्मचार्‍याकडून व्यवसायाचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाचखोरी होणे ही महसूल प्रशासनाच्या दृष्टीने शरमेची बाब आहे.

या तलाठ्याला वाचविण्यासाठी त्यांच्या संघटना देखील आज सायंकाळी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाजवळ ठाण मांडून होत्या. आदर्श तलाठ्याची ही लाचखोरी महसूल प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*