पालकमंत्री ना.पाटील यांच्या काळात जिल्ह्याची पीछेहाट

0

जळगाव । पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्याच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसुन त्यांच्या काळात जिल्हा विकासाच्या दृष्टीने मागे पडला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील यांनी आज केला.

दरम्यान दि. 12 डिसेंबर रोजी नागपुर हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणार्‍या हल्लाबोल मोर्चासाठी जिल्ह्यातुन तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपुर येथे निघणार्‍या हल्लाबोल मोर्चासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष, फ्रंटल्सचे पदाधिकारी यांची बैठक आज पार पडली.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती देतांना आ. डॉ. सतिश पाटील यांनी सांगितले की, दि. 1 डिसेंबरपासुन यवतमाळ येथुन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी हल्लाबोल दिंडी काढण्यात आली आहे. ही दिंडी दि. 11 डिसेंबर रोजी अंजनी येथे धनवटे महाविद्यालयाजवळ येणार आहे.

तेथुन विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असुन या मोर्चाचे नेतृत्व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार हे करणार आहेत. या मोर्चासाठी संपुर्ण जिल्हाभरातुन तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे लग्नाच्या निमीत्ताने आले आणि डिपीडीसी बैठक घेऊन रवाना झाले. जिल्ह्यात कपाशीवरील बोंडअळी, नुकसानीचे पंचनामे, बिबट्याची दहशत यासारखे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत.

मात्र या प्रश्नांकडे पालकमंत्री ना.पाटील यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांसंदर्भात काहीही देणेघेणे नाही. ज्यावेळी आमचे आघाडी सरकार होते, त्यावेळी यांनी केलेली आंदोलने त्यांना आठवत नाही का? असा सवाल आ. डॉ. पाटील यांनी उपस्थित केला.

भाजपाचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्यात वर्षभरात एकही नविन कामाचे नारळ फुटले नसल्याचे सांगितले. भाजपात तीन गट असल्याने प्रश्न कुणाकडे मांडावे या संभ्रमात जिल्ह्यातील नागरीक आहेत.

कामचुकार अधिकार्‍यांना पालकमंत्री ना. पाटील हे पाठीशी घालत असल्याचा आरोपही आ. डॉ. सतिश पाटील यांनी केला. यावेळी पत्रकार परीषदेस जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. रविंद्र पाटील, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. अरूण पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, महानगराध्यक्ष नीलेश पाटील, महिला शहराध्यक्षा निला चौधरी, सोपान पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*