झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल पद्धती प्रभावी ठरणार ! – दळवी

0

जळगाव । जनसेवा हीच ईश्वर सेवा हे बिद्र वाक्य घेऊन शासनाची वाटचाल सुरु आहे. मात्र अनेकदा काही कारणामुळे अनेक प्रकरणे महिनोंमहिने प्रलंबीत असतात, त्यामुळे सामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात.

वेळेवर काम होत नसल्याने शासनाबद्दल व पर्यायाने अधिकारी कर्मचार्यांबाबत सामान्यांमध्ये विरोधी भावना निर्माण होते. यावर पर्याय म्हणून झिरो पेन्डेन्सी व डेली डिस्पोझल ही पध्दत प्रभावी ठरणार असल्याचे प्रतिप्रादन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अंतर्गतच्या कार्यालयांसाठी झिरो पेंन्डसी व डेली डिस्पोजल (स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी नाशिक विभागातील जिल्हा परिषदांसाठी येथील कांताई सभागृहात विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे बोलत होते.

या कार्यशाळेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन, नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपायुक्त (आस्थापना) सुकदेव बनकर, उपायुक्त (विकास) श्री. मित्रगोत्री उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना दळवी पुढे म्हणाले की, झिरो पेंडन्सीची प्रमूख उद्दिष्टे ही कार्यालयातील अभिलेख व अभिलेख कक्ष अद्यावत करणे, अनावश्यक कागदपत्रे नाश करणे, कार्यालय आणि कार्यालयाचा परिसर स्वच्छ करणे ही आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांना पुरेशा सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्यांचा प्रशासन व शासनावरील विश्वास वाढणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांनी हा उपक्रम म्हणजे आपले उत्तरदायित्व समजून यामध्ये हिरारीने सहभाग घेऊन नागरीकांच्या अडचणींप्रती आपली संवेदनशीलता निर्माण करावी.

यामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. तसेच नागरीकांना अधिकाराचा कायदा व सेवा हमी कायदा वापरण्याची गरज भासणार नाही.

एवढेच नाहीतर झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल हा उपक्रम अधिकारी, कर्मचार्‍यांनी स्वत:साठी राबवावा. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना स्वत:च्या आरोग्यासाठी पर्यावरणपुरक व निरोगी वातावरण मिळण्यास होण्यास मदत होणार असल्याचेही दळवी यांनी सांगितले.मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात करा.असेही दळवी यांनी सांगितले.

यामध्ये प्रामुख्याने कार्यालयाचे मूलभूत व्यवस्थापन, त्याअंतर्गत सिक्स बंडल सिस्टीम, कार्यालयीन स्वच्छता, नीटनेटकेपणा, कार्यालयीन नोंदवहया, प्रशासकीय कामकाजामधील प्रलंबितता, विलंबाची कारणे, अभिलेख्यांचे वर्गीकरण, झिरो पेंडन्सीची उद्दीष्टे, नागरीकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, लोकाभिमुख व गतीमान प्रशासन, ई गव्हर्नन्स व एम गव्हर्नन्स बाबींना चालना देणे, यासाठी दैनंदिन निर्गतीची कार्यपध्दती प्रस्थापित करणे आदी विषयांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यात येतील असे सांगितले.

सर्वप्रथम सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजेंद्र भारुड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राबविलेल्या झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल अभियानाचे सादरीकरण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

*