काँग्रेसचा नागपूरला जनआक्रोश मोर्चा !

0

जळगाव । केंद्र सरकारने जीएसटी आणि आधारकार्ड लिंकींगबाबत अतिरेकी धोरण राबविले असून याप्रकारामुळे सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे.

केवळ अंबानी आणि अडाणीच्या फायद्यासाठी धोरणे राबविली जात असून या विरोधात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान 12 रोजी विधानभवनावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी दिली.

जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा सरचिटणीस डि.जी. पाटील, जिल्हा सरचिटणीस अजाबराव पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी माहिती देताना देशमुख म्हणाले की, देशात सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. भाजपाच्या परतीचा प्रवास हा नांदेडपासून सुरु झाला असून गुजरातपासून याला परतीच्या प्रवासाला आणखी वेग येईल. जनतेच्या मनात असलेला संताप व्यक्त करण्यासाठी विधानभवनावर मोर्चा काढल जाणार असून यात जिल्हाभरातून 2 हजार कार्यकर्ते हजेरी लावणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.

त्रास देणार्‍या अधिकार्‍यांचा हिशेब घेणार
स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना अडकविण्यात येत आहे. यात अधिकार्‍यांना देखील हाताशी घेतले जात असल्याचे आरोप देशमुख यांनी करीत अधिकार्‍यांनी निपक्षपातीपणे काम करावे अन्यथा आगामी दीड वर्षानंतर काँग्रेसची सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांची यादी बनवून त्यांचा हिशेब घेतला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

कपाशीची सरसकट नुकसान भरपाई द्यावी
राज्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रार्दुभाव वाढीस लागत असून शेतकर्‍यांना कपाशीचे पीक उपटून फेकावे लागत आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. मात्र नुकसान भरपाई संदर्भात शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीचे बिल सादर करण्याची अट शासनाने घातली आहे. राज्यातील 80 टक्के शेतकर्‍यांकडे खरेदी बील नसल्यामुळे ते नुकसान भरपाईपासून वंचित राहतील. त्यामुळे शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा सरचिटणीस डी.जी. पाटील यांनी केली आहे.

जिल्ह्याला फुलटाईम पालकमंत्री द्या
चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमावावे लागले आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अद्यापही या परिवारांना भेटी देऊन सांत्वन केले नाही. पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यास योग्य न्याय दिला जात नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यास फुलटाईम पालकमंत्री द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*