…तर मुलांची फी आयुक्त भरणार का ?

0

जळगाव । मनपा प्रशासनाकडून सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेमुळे हॉकर्सधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉकर्सचा मनपावर धडक मोर्चा काढण्यात आला. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अशी घोषणा देत आमचा मुलांची फी आयुक्त भरणार का? असा शब्दात हॉकर्सधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त राजेश कानडे यांना निवेदन दिले.

मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले मार्केटपासून हॉकर्सचा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी हॉकर्सधारकांचे पदाधिकारी आणि त्यांचे लहान-लहान मुलं शाळेच्या गणवेशात दप्तर घेवून सहभागी झाले होते.
डीवायएसपी सचिन सांगळेंनी दिली कारवाईची तंबी

महानगरपालिकेसमोर रस्त्यावरच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, डिवायएसपी सचिन सांगळे यांनी आंदोलन कर्त्यांची समजूत घातली. परंतु हॉकर्स ऐकत नसल्याने कारवाई करण्याचा इशारा देताच आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा केला.

हॉकर्ससाठी पर्यायी जागेची मागणी


बळीरामपेठ, सुभाष चौकातील हॉकर्सला सानेगुरु रुग्णालयातील जागेवर तर फुले मार्केटमधील हॉकर्सला जुन्या नपाच्या जागेवर पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी निलेश पाटील यांनी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

यावेळी कानडे यांनी स्थायी व महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच नो हॉकर्स झोनवर कारवाई सुरुच राहील.

असेही त्यांनी शिष्यमंडळाला सांगितले. यावर निलेश पाटील यांनी हॉकर्सवर कारवाई करता तर मग शहरातील अनधिकृत बांधकाम आणि फुले मार्केटमधील अतिक्रमीत गाळेधारकांवर का कारवाई करीत नाही? असा सवाल देखील उपस्थित केला.

मनपासमोर ठिय्या


महात्मा फुले मार्केटपासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चा पोहचल्यानंतर पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. त्यामुळे प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*