काँग्रेसच्या मोर्चापूर्वीच कार्यकर्त्यांचा ‘आक्रोश’

0

जळगाव । काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सहकार्य मिळत होते. परंतु पक्षाच्या बळकटीकरणासाठी प्रत्यक्षात कुठलेही सहकार्य मिळत नाही. अशा शब्दात नराजी व्यक्त करुन काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांच्यासमोर ‘आक्रोश’ व्यक्त केला.

सरकारच्या धोरणाविरोधात नागपूर येथे विधानभवनावर 12 रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातून जाणार्‍या कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा काँग्रेस भवनात आज जिल्हाभरातील पदाधिकार्‍यांची नियोजन बैठक घेण्यात आली.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, डी.जी.पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, उदय पाटील, सलिम पटेल, अविनाश भालेराव, प्रभाकर सोनवणे, जोत्स्ना विसपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस डी. जी. पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त केली.

सामंजस्याने अडचणींचा निपटारा करा !
प्रदेशच्या बैठकीत जे नेते आश्वासने देतात मात्र त्याचे पालन होत नाही. कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह आहे. मात्र गटबाजीमुळे पक्षाला यश येत नाही.

त्यामुळे महिन्या अखेर सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन यात कुणाच्या काय अडचणी आहेत. त्या मांडाव्यात आणि सामंजस्याने त्याचे निवारण करावे अशी सुचना जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांना केली.

सर्वांनी एकत्र येऊन सत्तेत जायचे या हेतून काम करावे. जनआक्रोश मोर्चात जास्तीत जास्त संख्या कशी आणता येईल यासाठी सर्वांनी आपापल्या परिने परिश्रम घेऊन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहनही देशमुख यांनी पदाधिकार्‍यांना केले.

LEAVE A REPLY

*