मंगळसुत्र चोरणार्‍या महिलेला 11 दिवसात शिक्षा

0

अडावद, ता. चोपडा, । धानोरा येथील बाजारातून मंगळसुत्राची चोरी करणार्‍या महिलेला 3 वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा केवळ 11 दिवसात ठोठाविण्यात आली. चोपडा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश ग.दि.लांडबळे यांनी हा अतिजलद न्याय देवून सर्वांनाच सुखद धक्का दिला.

चांदसणी-कमळगाव येथे दि. 23़ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ महाराजांची यात्रा होती. ह्यावर्षी सीसीटिव्हि कॅमेरे व तगडा पोलीस बंदोबस्त यामुळे चोरट्यांना दिवसभर चोरीची संधी न मिळाल्याने एका टोळीने आपला मोर्चा धानोरा येथील आठवडे बाजाराकडे वळवला.

सांयकाळी 5.30 वाजता चोरट्या 3 महीलांपैकी एकीने लिलाबाई महाजन (वय 50) या त्यांची सुन नंदा महाजन यांचेसोबत बाजार करीत असतांना लिलाबाई यांच्या मानेवर पाठीमागुन जोरात थाप मारून त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने हिसकावून घेतले. तेंव्हा नंदा महाजन यांनी महीलेचा पाठलाग करून तीला पकडले. इतर दोन्ही महीला गर्दीचा फायदा घेत पळून गेल्या.

आठवडे बाजार असल्याने धानोरा पोलीस पाटील दिनेश पाटील हे बाजारात होते. त्यांनी जमलेल्या महीलांसमक्ष महीलेस नाव, गाव, बाजारात येण्याचे कारण, चोरलेले मंगळसुत्र, याबाबत विचारपूस केली.

परंतू महीला तिचे नाव सुनिताबाई देवा वाघ रा.बारडोली (गुजरात) असा अपुर्ण पत्ता सांगुन गुन्हा केल्याचे कबुल करत नसल्याने सर्वांनी महीलेस रात्री 7.30 वाजता अडावद पोस्टेला आणले. नंदा महाजन यांचे तक्रारी वरून अडावद पोस्टेला गुरनं.59/17 भादंवि क.392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सुर्यास्त झाल्यानंतर महीलेस अटक करणे असल्यास महीला पोलीस अधिकारी असणे आवश्यक असल्याने पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे, चोपडा शहर यांनी महीलेची दोन महीला पंचासमक्ष अंगझडती घेतली व चोरलेले मंगळसुत्र हस्तगत करून प्रथमवर्ग न्यायालय, चोपडा यांची रात्री 10 वाजता परवानगी घेवून रात्री 11 वाजता सुनिताबाई वाघ हीस अटक केले.

त्यानंतर महीला सराईत चोर असल्याने व खोटे नाव पत्ता सांगत असल्याचा संशय आल्याने तसेच तपासात कोणतेही सहकार्य करीत नसल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सपोनि जयपाल हिरे यांनी स्वतः गुन्ह्याचा जलद गतीने तपास करत 5 दिवसात (दि.28़ नोव्हेंबर) न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयाने गुन्ह्यात सर्व साक्षीदारांना समन्स काढून खटला जलदगतीने चालवत दोषी महीलेस दि.4़ डिसेंबर रोजी 3 वर्ष सश्रम कारावास व 5,000 रू. दंड तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस 5,000 देणेबाबत शिक्षा ठोठावली.

निकालात दंड न भरल्यास 6 महीने अतिरीक्त कारावासाची तरतूद आहे. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता गजानन खिल्लारे यांनी खटल्याचे कामकाज पाहीले व पो ना मोहन जावरे यांनी पेहरवी अधिकारी म्हणून मदत केली.

खटल्याची सुनावणी फक्त 5 कार्यालयीन दिवसात पुर्ण करत प्रथम वर्ग न्यायाधीश ग.दि.लांडबळे यांनी दोषींना शिक्षा सुनावली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 11 दिवसात गंभीर गुन्ह्यात दोषारोपपत्र सादर होऊन दोष सिद्ध झाल्याने धानोरा ग्रामस्थ, महिलांनी पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेचे कौतुक केले आहे.

पाच दिवसात दोषारोप पत्र
23 नोव्हेंबर रोजी मंगळसुत्र चोरीचा गुन्हा अडावद पोलिसात दाखल झाला. संशयित महिला तपासात सहकार्य करत नव्हती. स.पो.नि.जयपाल हिरे यांनी स्वत: तपास करून पाच दिवसात म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी चोपडा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. दोषारोप पत्र दाखल झाल्यामुळे खटल्याच्या कामाला गती मिळाली.

तीन वर्ष सक्तमजूरी
प्रथम वर्ग न्यायाधीश ग.दि.लांडबळे यांनी या खटल्याची सुनावणी पाच कार्यालयीन दिवसात पुर्ण केली. सर्व साक्षीदारांची साक्ष झाली.

दोषारोप निश्चित करून आज संबंधीत महिला चोराला तीन वर्ष सक्तमजूरी, पाच हजार दंड आणि फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपये देण्याची शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

*