डिपीडीसीच्या बैठकीवरही कपाशीच्या बोंडअळीचा प्रभाव

0

जळगाव । कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या विषयावरून आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक चांगलीच गाजली. कुठलीही अट न ठेवता सातबारानुसार पंचनामे करण्यासाठी आमदारांनी आक्रमक भुमिका घेतली.

दरम्यान पिकसंवर्धनांतर्गत पिकांच्या संरक्षणासाठी तरतुद पुरेशी नसल्याने माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनीही नाराजी व्यक्त केली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ना. उज्ज्वला पाटील, खा. ए.टी.पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांनी सन 2018-19 च्या आराखड्याविषयी माहीती दिली.

वर्षभरात एकही नारळ फुटले नाही – आ.एकनाथराव खडसे


जिल्ह्याचा आराखडा 441 कोटीचा आहे. तेवढे जरी मिळाले तरी आनंद आहे. आधीच या निधीला 40 टक्के कपात लागली आहे. ती पुन्हा लागु नये. जिल्हा परीषदेच्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. बांधकाम मंत्री म्हणुन विशेष बाब म्हणुन या रस्त्यांच्या कामाला मंजुरी द्यावी अशी मागणी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केली. तसेच पिक संरक्षणासाठी कमी तरतुद करण्यात आली असुन त्यावर अधिक पैसा ठेवणे गरजेचे आहे. जनसुविधांसाठी केवळ 3 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 15 तालुके असुन एवढा निधी पुरेसा नसुन तालुक्यात भानगडी लागण्याचे हे काम असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात जलयुक्तचे एकही नविन काम मंजुर झाले नाही. शासन निर्णयात असलेल्या अनेक जाचक अटींमुळे ही कामे सुरू होणे शक्य नाही. त्यामुळे शासन निर्णयात सुधारणा करणे गरजचे असल्याचे सांगत वर्षभरात एकाही कामाचा नारळ फुटला नसल्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

 

शेतीप्रश्नावरून आ.डॉ.सतिश पाटील यांचा संताप


राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील यांनी शेतकर्‍यांच्या विषयावरून पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, जिल्ह्यात 3 लाख 89 हजार हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाकडुन या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍याला पावती आणि पिशवी मागणी करून त्यांची थट्टा केली जात आहे. तसेच कृषी अधिकारी शेतकर्‍याला कपाशी उपटण्याचा सल्ला देत असुन कपाशी उपटुन टाकल्यास पंचनामे करणार कशाचे? असा सवाल उपस्थित केला. आ. उन्मेश पाटील, आ. किशोर पाटील, यांनी देखिल पालकमंत्र्यांवर या विषयावरून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले असुन संबंधित कंपनीविरूध्द गुन्हे देखिल दाखल करण्यात आले आहे. पंचनामे पुर्ण झाल्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या नुकसान भरपाईबाबत राज्यस्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जलयुक्तच्या कामांच्या चौकशीचे आदेश
नियोजन बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील, आ. संजय सावकारे, आ. उन्मेश पाटील यांनी स्थानिक स्तर आणि जलसंधारण विभाग एकच काम दाखवुन दोन वेळा पैसे काढले जात असल्याचा आरोप केला. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनीही जलयुक्तच्या कामांची बोगस बिले काढली जात असुन हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आमदारांनी स्वत:च्या लेटरहेडवर तक्रारी दिल्यास सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले.

करपा निर्मुलनाची योजनाच बंद
केळीवरील करपा नियोजनासंदर्भात कृषी विभागाने काय उपाययोजना केल्या आहेत असा प्रश्न आ. हरीभाऊ जावळे यांनी उपस्थित केला. मात्र ही योजनाच गेल्या वर्षापासुन बंद असल्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी सभागृहात उघड केले. त्यावर कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ही बाब सत्य असुन याबाबत फलोत्पादन संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.

माजी महापौर लढ्ढांनी मांडला उड्डाण पुलाचा प्रश्न
महापालिकेचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी जळगाव शहरातील शिवाजी नगर आणि पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी पुढील दोन वर्षात ‘फाटकमुक्त महाराष्ट्र’ हे अभियान राबविले जाणार असुन येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व रेल्वे पुलांसाठी तरतुद करण्यात येऊन त्यांचे काम पुर्ण केले जाणार असल्याचे सांगितले. शिवाजीनगर उड्डाण पुलाचे डिझाईन तयार झाले असुन 15 दिवसात आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे बांधकाम अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.

आ.किशोर पाटलांचा इतिवृत्तावर आक्षेप
शिवसेनेचे आ.किशोर पाटील यांनी मागील इतिवृत्तात अधिकार्‍यांनी दिलेल्या उत्तरावर आक्षेप घेतला. तसेच जिल्ह्यात तलाठ्यांनी दाखले देणे बंद केले असल्याने शेतकर्‍यांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची भीषण परिस्थिती असून जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जिल्ह्यात मका खरेदी केंद्र देखील सुरु नसल्याने शेतकर्‍यांचे हाल होत आहेत, असे सांगितले. त्यावर पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी दाखल्यासंदर्भात बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासंदर्भात शासनाचे काही नियम असून त्या नियमाला आधीन राहून दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. खरेदी केद्रांबाबत पणनच्या अधिकार्‍यांशी समन्वय साधून ही केद्रे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना ना.चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले.
जि.प. सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी मांडले आरोग्याचे प्रश्न

जिल्हा परिषद सदस्या डॉ.निलम पाटील यांनी ग्रामीण उपरुग्णालयासह कर्मचार्‍यांच्या रिक्त जागांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेण्याचे आदेश डॉ.बबीता कमलापुरकर यांना दिले.
बैठकीत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी निधी द्या, अशी मागणी केली. तर जि.प. सदस्या नंदा पाटील यांनी रावेर नगरपालिका क्षेत्राची हद्द वाढवून देण्याबाबत मागणी केली.

बिबट्यावरूनही रणकंदन
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडी येथील बिबट्याच्या विषयावरून जिल्हा नियोजन बैठकीतही आमदारांनी चांगलेच रणकंदन केले. आ. डॉ. सतिश पाटील, आ. किशोर पाटील, आ. उन्मेश पाटील यांनी बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाकडुन प्रयत्न केले जात असले तरी त्यांच्याकडे आवश्यक ते साहीत्य उपलब्ध नसल्याचे सांगुन प्रशासनाविरूध्द तीव्र संताप व्यक्त केला. यापुढे जीव गेला तर प्रशासन जबाबदार राहील अशी भुमिकाही आमदारांनी मांडली. त्यावर जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी उत्तर देतांना सांगितले की, या घटनेचा मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. बिबट्याला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी औरंगाबाद येथून दोन खाजगी शार्पशुटर देखील त्याठिकाणी तळ ठोकून असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*