घाणखेडला आग : वीज कार्यालयाची तोडफोड

0

बोदवड । तालुक्यातील घाणखेडे येथे दुपारी तीन वाजेदरम्यान मनोज वराडे यांच्या शेतीशिवारात आग लागली. या आगीत मुकी जनावरे होरपळली. वीज बंद असल्याने पाणी पंपाने पाणीही मारता येत नव्हते.

सब स्टेशन कर्मचारी वीज सुरू करित असल्याचा राग येवून घाणखेड येथील काही लोकांनी एणगाव सबस्टेशनवर येवून कार्यालयाची तोडफोड केली व हजर कर्मचार्‍यांनाही मारहाण केली. घाणखेडला लागलेल्या आगीचा राग एणगाव सबस्टेशनवर काढल्याने बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

घाणखेडे येथे मनोज वराडे यांचे शेतशिवार आहे. बाजुलाच गुरांच्या खाण्यासाठीची कुट्टी गोदाम आहे. या गोदामाला सुध्दा आगीने लक्ष केल्यानंतर आग मोठ्या प्रमाणात वाढली.

बाजुला गाय, वासरे, म्हशी आणि बैल बांधले हेाते. आगीच्या ज्वाळा त्या मुक्या जनावरांपर्यंत येवून पोहचल्याने त्यांना सोडविणे कठिण झाले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी विहिरीतील पाणी वीजपंपाने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला.माव् वीज पुरवठा बंद असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

एणगाव वीज केंद्रावर हल्लाबोल – घाणखेडे या गावाला वीज पुरवठा करणारे वीज उपकेंद्र एणगाव येथे आहे. या ठिकाणी घाणखेडकरांनी दूरध्वनीवर संपर्क साधून वीज प्रवाह सुरू करण्याची विनंती केली.

मात्र कर्मचार्‍यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने काही गावकरी एणगाव वीज केंद्रावर दाखल झाले. आणि त्यांनी हजर असलेल्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घालत कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनास्थळी दूरध्वनी, टेबल, खुर्ची, खिडक्यांच्या काचा, अग्निशमन सिलेंडर आदी वस्तु तुटून विखुरलेल्या दिसत होत्या.
बंदचे परमीट असल्याने नाईलाज – दरम्यान या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या संबंधीत कर्मचारी व अधिकार्‍यांशी चर्चा केली असता, वीज पुरवठा परवानगी (परमीट) घेवून खंडित केला होता.

ज्यावेळी घाणखेडे येथून विज पुरवठा सुरू करण्याबाबत सूचना आली तेव्हा कार्यक्षेत्रावर लाईनमन कार्यरत होते व अचानक वेळेआधी वीज पुरवठा सुरू केला असता तर अपघात घडून कर्मचार्‍यांच्या जीवावर बेतले असते.

शिवाय तसे करणे नियमबाह्य होते. म्हणून वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात आला नाही. अशी माहिती कर्मचार्‍यांनी दिली.

पोलिस तात्काळ घटनास्थळी – एणगाव सब स्टेशनवर घाणखेडच्या काही गावकर्‍यांनी हल्ला केल्याचे समजताच पोलिस उपनिरिक्षक अंबादास पाथरवट तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मात्र तोपर्यंत हल्ला करणारे संशयीत पसार झाले होते. पोलिसांनी वीज उपकेंद्रावरील तोडफोड आणि नुकसानीची पाहाणी केली. तथा मारहाण झालेल्या कर्मचार्‍यांना वैद्यकिय तपासणीसाठी रवाना केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे वीज कंपनीचे कर्मचारी व अधिकारी मात्र भयभीत झाले होते.

…यांच्यावर गुन्हा दाखल – याबाबत बोदवड पोलिसात एणगाव वीज उपकेंद्राचे ऑपरेटर अमोल नानाजी राऊत (वय 32) यांच्या फिर्यादीवरून मनोज वराडे, राजू शेटे, राजू वराडे, सुभाष वराडे यांच्यासह आठ ते दहा (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा.घाणखेडा, ता.बोदवड यांच्याविरूध्द गु.र.नं. 75/17 भा.दं.वि. 353, 332, 186, 143, 147, 323,504, 506,427, प्रापर्टी डॅमेज अ‍ॅक्ट 1994 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय बारकू जाने करित आहे.

LEAVE A REPLY

*