दीपस्तंभने दिले दिव्यांगांना ‘मनोबल’

0

जळगाव । समाजात अंध, अपंग, मुकबधीर व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा आपुलकीच्या नात्यापेक्षा दयेचा आहे. त्यामुळे समाजाच्या अशा वागणुकीतूनच दिव्यांग मुलांना वेगवेगळ्या समस्यांना आयुष्यभर तोंड द्यावे लागते. असामान्य म्हणून जन्माला आलेल्या जिवाला सामान्य जिवन जगता येत नाही.

मात्र त्यांच्यात एक अतिरिक्त, अनाकलनीय शक्ती असते. जिद्दीच्या बळावर अधिकारीपदावर पोहोचण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आवश्यकता आहे ती योग्य मार्गदर्शनाची यासाठी दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारतातील पहिले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या केंद्रातील 70 ते 80 टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात असून दिव्यांगांसाठी हे केंद्र आशेचा किरण ठरत आहे.

देशाचे नागरिकत्व असलेली एक व्यक्ती म्हणून दिव्यांगांना त्यांचे नागरिकत्वाचे हक्क व सोयीसुविधा देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. मात्र सरकारी यंत्रणा यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.

दिव्यांगांना यातना सुसह्य करण्याचं, त्यांच्या पंखांत बळ भरण्याचं आणि केवळ त्यांनाच मोठं करण्यासाठी दीपस्तंभ फाऊंडेशन अंतर्गत मनोबल केंद्र सुरु असून दीपस्तंभचे हे कार्य अनोखे आणि कौतुकास्पद असेच आहे. हे निवासी केंद्र देशभरातील दिव्यांगांना दीपस्तंभासारखं दिशा देत आहे.

ब्रेल लायब्ररीची सुविधा
प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळ े ते स्पर्धा परिक्षांकडे फारसे वळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ब्रेल लिपीत साहित्य उपलब्ध नसल्याने मनोबल केंद्रात विशेषतः अंध विद्यार्थ्यांसाठी उच्चस्तरीय स्पर्धा परीक्षांचे सर्व संदर्भ साहित्य ब्रेल लिपीत करण्यात आले आहे.

ही सर्व पुस्तके ऑडिओ स्वरूपातही आहेत. या प्रकल्पातून अपंग विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. दिव्यांगांना समुपदेशन करण्यासाठी त्यांच्यामधूनच सात तज्ज्ञ मार्गदर्शकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसहभाग वाढतोय
दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन यांनी सुरुवातीस मनोबल केंद्राची स्थापना केली असता. आर्थिक अडचणी उद्भवल्या अपंगांसाठी निवासी केंद्र उभारण्याचे आव्हान पेलताना प्रकल्पासाठी येणारा खर्च खुप आहे. मात्र जसजसे याबद्दल समाजात जागृती निर्माण होत आहे. तसतसा मदतीचा ओघही वाढत आहे. या केंद्रासाठी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून आर्थिक मदत दिली जात आहे.

LEAVE A REPLY

*