अजिंठा चौफुलीच्या मधोमध उभारणार बळीराजाचा पुतळा

0

जळगाव । अजिंठा चौफुलीवर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे तेथील अतिक्रमण काढून विस्तार करण्यात येणार आहे. जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून सुशोभिकरण करण्यात येणार असून येत्या महिनाभरात कामाला सुरुवात केली जाणार आहे. तसेच चौकाच्या मध्यभागी बळीराजाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर ललीत कोल्हे यांनी दिली.

अजिंठ्याचे प्रवेशद्वार मानले जाणार्‍या जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. दोन महिन्यापुर्वी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी त्याठिकाणची पाहणी केली आणि चौकाचा विस्तार आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला.

चौफुलीवर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे लवकरच चौकाचा विस्तार करण्यात येणार आहे.

जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून सुशोभिकरण
भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, टॉवर चौक पाठोपाठ आता अजिंठा चौफुलीचेही जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार डिझाईन तयार करण्यात आली आहे.

चहुबाजुंनी दुभाजक
अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूंनी 30 मीटर अंतरावर दुभाजक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टळेल. तसेच चौकाच्या मध्यभागी लक्षवेधी असा बळीराजाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे महापौर ललीत कोल्हे यांनी सांगितले.

अप्पर आयुक्तांनी केली पाहणी
अजिंठा चौफुलीसह बाजुला असलेल्या भंगार बाजाराची अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी सायंकाळी पाहणी केली. तसेच त्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची सूचना दिली.

LEAVE A REPLY

*