अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा…

0

चेतन चौधरी,जळगाव । आईच्या पोटात मुलीचा गर्भ वाढत असल्याचे समजताच कुटूंबीयांनी जन्माअगोदरच मारण्यासाठी आणलेला दबाव… त्याचच जन्मत: दोन्ही हात नसल्यामुळे पदरी आलेली दिव्यांगता!

मात्र निराश न होता दिव्यांग लक्ष्मीने परिस्थितीशी झुंज करीत केवळ पायांच्या हिंमतीवर विविध छंद जोपासले असून पायाने लिखाण करणे, चित्रकला, रांगोळी काढणे असो किंवा घरात स्वयंपाक करणे या सर्व कलांमध्ये प्राविण्य मिळविले आहे.

याही पुढे जात आयएएस होऊन आई-वडिलांना समाजात सन्मान मिळवून देण्याची लक्ष्मीची धडपड सुरु असून “अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा किनारा तुज पामराला” या कुसुमाग्रजांच्या काव्यपक्तींचा प्रत्यय आणून दिला.

निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही तरी विशेषत: बहाल केली आहे. काहींना शारिरीक व्यंग असल्यास त्याची उणीव भरुन काढण्यासाठी काही तरी गुण दिले असतात.

गरज आहे आत्मपरिक्षणाने ती ओळखण्याची अशाच एका लक्ष्मीने आपल्यातील क्षमता ओळखून प्रयत्नपूर्वक त्याचा विकास केला.

सोलापूर येथील शेतकरी कुटूंबात जन्मलेली लक्ष्मी संजय शिंदे हिच्या कुटूंबीयांनी गर्भात मुलगा आहे कि मुलगी हे पाहण्यासाठी जन्माअगोदरच डॉक्टरांकडून सोनोग्राफी केली.

मुलीचा गर्भ असल्याचे समजताच गर्भापात करण्याचा सल्ला कुटूंबीयांनी देऊनही आई-वडीलांनी कुणाच्याही विरोधाला न जुमानता मुलीला जन्म दिला.

घरात मुलगी जन्माला आली. त्यातल्या त्यात ती दिव्यांग, जन्मत:च दोन्ही हात नसल्यामुळे बालपणीच मारण्यासाठी घरच्यांनी दबाव आणला. परंतु काही झाले तरी मुलीला शिकवायचे, अधिकारी बनवायचे असे ठरवून वडिलांनी लक्ष्मीला शाळेत प्रवेश घेऊन दिला.

बालवयात पायानेही धड चालता येत नव्हते, तोल गेल्यास सावरण्यासाठी हात नव्हते, मुलीला चालता येत नाही त्यामुळे शिक्षकांनी शाळेत येण्यास नकार दिला.

परंतु वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे शाळेतही अनंत अडचणींचा सामना करीत लक्ष्मीने 12 वी पर्यंत शिक्षण पुर्ण केले. यादरम्यान घरात आई- वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पायाने लिखान करणे, चित्र काढणे, मेहंदी, रांगोळी काढण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत विविध कलांमध्ये प्राविण्य मिळविले.

आयएएस होण्याची जिद्द उराशी बाळगून लक्ष्मीने जळगाव गाठले. येथील दीपस्तंभच्या मनोबल केंद्रात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन आयएएस होण्याच्या दिशेने लक्ष्मीने वाटचाल सुरु ठेवली आहे.

तसेच नुतन मराठा महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाचे शिक्षणही पुर्ण करीत आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्यांचीच पुस्तके वाचली जातात.

मात्र अपयशाच्या अनुभवातूनच यशाचा मार्ग उजळू शकतो. यासाठी असे काही आदर्श व्यक्तीचे पुस्तक वाचन करीत असल्याचे लक्ष्मी सांगते. मुलीला जन्म देणे समाजात कमीपणाचे समजले जाते.

समाजाच्या विरोधाला न जुमानता आई-वडीलांनी मला जन्म दिला. त्यामुळे याच समाजात जन्मदात्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी अधिकारी होणारच! असे ध्येय समोर ठेवले आहे.

दीपस्तंभ मनोबल केंद्राच्या सहकार्यामुळे आयएएसचा पल्ला नक्कीच गाठणार असा विश्वासही लक्ष्मीने व्यक्त केला. अशा धडपड्या दिव्यांग लक्ष्मीला सलाम !

LEAVE A REPLY

*