वरणगावच्या उलटफेरमुळे अनिल चौधरी पुन्हा चर्चेत

0

जळगाव । दोन दिवसांपूर्वी झालेल्या वरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपात उभी फूट पडली. माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचेच कट्टर समर्थक सुनील काळे व भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांच्या पत्नी सौ.रोहिणी जावळे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुरु झालेल्या घडामोडीत आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी मिळणार नाही हे लक्षात येताच सुनील काळे यांनी जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेत ‘फिल्डिंग’ लावली.

ना.महाजनांनी त्यांचे विश्वासू सहकारी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याकडे जबाबदारी सोपविताच वरणगावात उलटफेर झाला. सुनील काळे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे अनिल चौधरी पुन्हा चर्चेत आले.

वरणगाव पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत कुणालाही बहुमत न मिळाल्याने पहिल्या अडीच वर्षांसाठी अपक्षांच्या मदतीने भाजपाच्या सौ.अरुणाबाई इंगळे नगराध्यक्षा झाल्या.

पुढच्या अडीच वर्षांसाठी निवडणूक जाहीर होताच भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. गेल्या अनेक वर्षांपासून आ.एकनाथराव खडसे यांचे समर्थक असलेले सुनील काळे व सुधाकर जावळे समोरा-समोर आल्याने वाद निर्माण झाला.

त्यात मार्ग काढण्यासाठी आ.संजय सावकारे यांनी भुसावळ येथे बैठक घेतली. त्यात सुधाकर जावळे यांच्या पत्नी सौ.रोहिणी जावळे यांच्या बाजुने वरिष्ठांचा कौल असल्याचे लक्षात येताच.

सुनील काळे यांनी 25 वर्षांपासूनची आपली नाथाभाऊनिष्ठा सोडत जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेतल्याने वरणगावच्या निवडणुकीची सूत्रे अनिल चौधरी यांच्याकडे सोपविली गेली.

अर्थात सुनील काळे यांना याआधीचा अनुभव कटू असल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले असावे? ग्रामपंचायत असतांना याठिकाणी सौ.रोहिणी जावळे व सुनील काळे यांच्या आई सौ.रुक्मिणीबाई रमेश काळे यांच्यात सरपंचपदासाठी स्पर्धा होती.

त्यावेळीदेखील वरिष्ठांनी सुनील काळे यांना बाजुला सारत जावळे यांना संधी दिली होती. त्यावेळेपासून काळे नाराज असले तरी त्यांनी आपली निष्ठा आ.खडसेंवर कायम ठेवली होती.

त्यामुळे आता जर संधी हुकली तर पुन्हा संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच सुनील काळे यांनी आपली खेळी खेळली. त्याला अनिल चौधरींनी मूर्तरुप दिले.

भुसावळ मतदारसंघात वरणगावने चौधरीबंधुंना नेहमीच साथ दिली आहे. त्यातच अनिल चौधरी यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून चांगलीच पकड निर्माण केली आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याने त्यात सुनिल काळेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची ‘मदत’ आवश्यक होती.

त्यासाठी अनिल चौधरी यांनी राष्ट्रवादीचे राजेंद्र चौधरी यांची सर्वात आधी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार करुन घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक सुनिल काळेंच्या मागे उभे केले.

शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका शशी संजय कोलते यांनी देखील काळेंना मदत केली. त्यातच दोन अपक्षांना देखील सोबत घेतल्याने सुनिल काळेंचा सहज विजय झाला. यातून अनिल चौधरींचा वरणगावमधील आपला करीश्मा कायम असल्याचे समोर आले.

गेल्या अनेक दिवसांपासून अनिल चौधरी बोरी-अनेर परिसरात आमदारकीची तयारी करीत आहेत. परंतु त्यांनी आता तापी पट्यात देखील आपल्या कामाची पावती दाखविल्याने आगामी निवडणूक चौधरी नेमकी कुठुन लढवतात हे लवकरच समोर येणार आहे. मात्र वरणगावच्या उलटफेरामुळे पुन्हा एकदा अनिल चौधरी चर्चेत आले, हे मात्र खरे!

LEAVE A REPLY

*