गाळ्यांबाबत धोरण निश्चित करण्यासाठी शासनाने मागविली माहिती

0

जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-राज्यभरातील नगरपालिका आणि महानगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे धोरण निश्चित करण्यासाठी शासनाने महानगरपालिकेकडून माहिती मागविली आहे.

गाळ्यांबाबत राज्यातील प्रत्येक नपा आणि महापालिकेचे वेगवेगळे धोरण आहे. त्यामुळे सर्व नपा आणि मनपासाठी एकच धोरण निश्चित करण्याची हालचाल शासकीय पातळीवर सुरु आहे.

त्यामुळेच जळगाव मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांचा निर्णय देखील शासनाकडे प्रलंबित आहे. मनपाच्या गाळ्यांच्या ठरावाबाबत नगरविकास राज्यमंत्र्यांकडून सुनावणी देखील झाली आहे.

परंतु निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. राज्यभरातील सर्व नपा आणि मनपाकडून माहिती मागविल्यानंतर एकच धोरण सर्वांसाठी निश्चित केले जाणार आहे.

त्यासाठी शासनाने जळगाव मनपासह राज्यभरातील सर्व नपा आणि महापालिकेकडून माहिती मागविली आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या गाळ्यांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

अनुकंपतत्वावरील नियुक्तीच्या मागणीसाठी मनपासमोर उपोषण
महानगरपालिकेत अनुकंपावर भरती करण्यात यावी, या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली. गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा करुन देखील प्रशासनाकडून अनुकंप तत्वावर नियुक्ती प्रलंबित आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरीत नियुक्त करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

रेल्वेस्थानक परिसरात ‘नो हॉकर्स झोन’
रेल्वे स्थानक परिसरातील 50 मीटरचा भाग नो हॉकर्स झोन क्षेत्र निश्चित करण्यात यावा, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहेे. या निर्णयाच्या आधारावर शासनाच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना पत्र पाठवून रेल्वे स्थानकाच्या 50 मीटर अंतरावर नो हॉकर्स झोन करण्याचे आदेश दिल्या आहे. रेल्वे स्थानक परिसरात टाईम झोन बाबत महासभेत ठराव करुन निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत हॉकर्सला वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु नवीन निर्णयानुसार टाईम झोन रद्द करण्याचा ठराव महासभेत करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांनी केली.

सार्वजनिक शौचालयाचा देणार मक्ता
शहरातील सार्वजनिक शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्यास मक्तेदाराने नकार दिला आहे. त्यामुळे नवीन मक्ता देणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली. सार्वजनिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी नाशिक येथील नवल वेलफेअर फाऊंडेशनला 10 वर्षाच्या कराराने मक्ता दिला होता. परंतु मनपाने 20 महिन्याचे बिल अदा न केल्याने मक्तेदाराने काम करण्यास नकार दिला. त्यामुळे आता नवीन मक्ता दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*