जपानच्या तज्ज्ञांकडून भाऊंचे उद्यान, गिरणा टाकीची पाहणी

0

जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-अमृत योजनेतंर्गत शहरात करण्यात येणार्‍या पाणीपुरवठा, भुयारी गटार व मलनि:स्सारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या जपान येथील द जपान कौन्सिल ऑफ लोकल थॉरिटीज फॉर इंटरनॅशनल रिलेशन सिंगापूर या कंपनीच्या चार तज्ञांचे पथक शहरात आले आहे.

या तज्ञांनी अमृतच्या कामांसाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्यचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांना दिले. दरम्यान सकाळी भाऊंचे उद्यान आणि गिरणा टाकीची तज्ञांनी पाहणी केली.

शहरातील अमृत योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी जपान येथील यामतानी किमीओ, सीयू मिन यांग, कावासाकी अकितो, अकिहिरो तेरानिशी या चार तज्ञांचे पथक शहरात दाखल झाले आहे.

या पथकाने आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी मनपाचे अभियंता योगेश बोरोले, जैन इरिगेशनचे श्री. चौधरी उपस्थित होते.

पथकाला माहिती देतांना जिल्हाधिकारी यांनी सांगीतले की, शहरात कचर्‍याची समस्या मोठया असल्याने त्याचे संकलन, वर्गीकरण आणि वाहतुक यामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यात येत आहे.

तसेच घनकचरा व्यवस्थापनावरही भर देण्यात असून प्रदुषणावर मात करण्यासाठी अमृत योजनेतंर्गत शहरात हरितक्षेत्र निर्माण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतांना शहराची रचना लक्षात घेऊन हरितक्षेत्र तयार करण्याच्या सुचना शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.

जैन हिल्सचा परिसर शिष्ट मंडळ भारावले

जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करतांना भारत हा देश पर्यटनाच्याबाबतीत पुढारलेला देश असून भारतात ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक पर्यटन चांगल्याप्रकारे विकसित झाल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले. तसेच जैन हिल चा परिसर बघून भारावून गेल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले.

दरडोई उत्पन्नात जिल्ह्याचा दुसरा क्रमांक

जळगाव जिल्ह्याचा आर्थिक पाया हा शेती असून याठिकाणी केळी, कापूस, तूर, मुग, सोयाबीन ही पीके घेतली जातात. सोन्याची मोठी बाजारपेठ शहरात असून शुध्दतेच्याबाबतीत जळगावचा देशभर नावलौकीक आहे.

शहरात चटईचे मोठया प्रमाणात उत्पादन होत असून आखाती देशात या चटईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यात शेतीपुरक उद्योगांना चालना देण्यात येत असल्याचे सांगून राजकीदृष्टया जिल्हा सजग आहे.

तसेच दरडोई उत्पनात जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळास सांगितले.

LEAVE A REPLY

*