Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

तरुणाई भविष्य नव्हे तर देशाचं वर्तमान : तुषार गांधी : गांधी तीर्थवर नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पला सुरवात

Share
जळगाव ता. २६ (प्रतिनिधी) : आपण नेहमी बोलताना तरुण म्हणजे देशाचं भविष्य आहे, असेच म्हणतो आणि तरुणांना भविष्यासाठी जगण्याचा सल्ला देत असतो. वास्तविकता ही आहे की तरुणाई देशाचं वर्तमान आहेत, त्यांना वर्तमानाची जाणीव करुन द्यायला हवी. ती जाणीव झाल्यास त्यांना प्रश्न समजायला लागतील, ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील असे प्रतिपादन महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आयोजित नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पच्या उदघाटन सत्रात ते बोलत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात झालेल्या या उदघाटनाला गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त आणि सेवादास दलुभाऊ जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन आय्यंगार, महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जैन परिवारातील स्नुषा सौ. अंबिका अथांग जैन उपस्थित होत्या.

उदघाटनपर भाषणात तुषार गांधी यांनी लिडर आणि लिडरशीप यातील फरक स्पष्ट केला. ते म्हणाले, नेतृत्व आणि नेतागिरीतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आज अनेक जण नेतागिरी करताहेत, नेतृत्व करत नाहीत. नेतृत्व करणारे आपले काम करत असतात. आजच्या नेत्यांमध्ये ‘मी पणा’ खुप मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. ही वास्तविकता आहे, ती नाकारता येणार नाही.

लीडर असे बना ज्यांना पाहुनच प्रेरणा मिळायला हवी. बापूंचे जीवन प्रेरणादायीच होते. नेतृत्वासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते याचा शोध बापूंच्या जीवनापाशी येऊन थांबतो. बापूंच्या जीवनातून आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळते. बापू जीवनातील प्रत्येक क्षण चांगला करण्यात व्यस्त असायचे. त्यासाठी ते स्वत: प्रयत्न करत असत. म्हणून तरुणांनी वर्तमानात जगले पाहिजे, भविष्याचा वेध घेत असताना वर्तमान हातातून निसटुन जाते.

या कॅम्पमधुन चांगले बनण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला हवे. आपण एकमेकांचे सुती हार घालून स्वागत केले, हा सुतीहार म्हणजे राष्ट्रबंधन व्हायला हवे. आपल्यातील भाषा, जात, प्रांत यांचे वाद मिटवायचे असतील तर खादीचा स्वीकार करायला हवा म्हणजे आपण सर्व एकाच पातळीवर येऊ असेही ते म्हणाले.

शेतकरी आणि युवक संकटात : डॉ. आय्यंगार

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन आय्यंगार म्हणाले, आजचा शेतकरी आणि युवक संकटात आहे. राजकारणात भ्रष्टाचार व कुटीलता वाढली आहे, त्यावर महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान महत्वाचे ठरते. परंतू आपण ७० वर्षांत गांधीजींचे ऐकले नाही. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे संपूर्ण जीवन शेतकरीमय होते, असा गौरवपूर्ण उल्लेख करून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या त्यांच्या कार्याला अधोरेखित केले. या युवा कॅम्पमध्ये कस्तुरबा कोण होत्या याविषयी उपस्थितांना मोहन कस्तुर ते बा-बापू असा आश्रम जीवनातील त्यांचा प्रवास उलगडुन सांगितला. कस्तुरबांच्या जीवनातील परिवर्तन आजच्या महिलांनी समजून घ्यायला हवे. सत्य बोला, अहिंसेचा मार्ग स्वीकारा, निसर्गाचे पावित्र्य ठेवा असा मंत्र त्यांनी उपस्थितांना दिला.

सत्य, अहिंसेच्या बळावर भारत महासत्ता बनेल : दलुबाबा जैन

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्यात उपजतच लीडरशीप होती. सत्य, अहिंसेच्या बळावर आपला भारत महासत्ता बनेल. भारतापासुन सर्वांना मार्गदर्शन मिळेल, ते दिवस दूर नाहीत असे सांगून ते म्हणाले, गांधीजींच्या विचारांनी लीडरशीप प्रखर आणि उन्नत होत जाते. अपरिग्रहाचा स्वीकार भवरलालजी जैन यांनी केला होता. भवरलालजींच्या आचरणातून शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल झालेले आज आपण पाहू शकतो, लीडरशीपचे हे उत्तम उदाहरणच होय. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामविकासाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गतच बा-बापू १५०व्या जयंतीनिमित्त देशातील १५० गावे स्वावलंबी करण्याचे, महात्मा गांधी आणि भवरलालजी जैन यांचे स्वप्न साकार होत आहे.

प्रास्ताविक करताना गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डीन डॉ. जॉन चेल्लादुरई म्हणाले, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून गांधी परंपरा पुढे नेण्याचे कार्य भवरलालजी जैन यांनी सुरू ठेवले आहे. नवीन पिढ्यांना गांधीजींचे संदर्भ माहित व्हावे, त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी फाऊंडेशनतर्फे चालणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली व त्यापासून समाजातील वेगवेगळ्या घटकांना किती व कसा फायदा होत आहे याची माहिती दिली.

सुरवातीला अनुभूती निवासी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सादर केली. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी अश्विन झाला यांनी सुत्रसंचालन केले. भुजंगराव बोबडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

आगळे-वेगळे स्वागत

या कॅम्पला देशभरातून आलेल्या तरुणांनी एकमेकांना सुती हार घालून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. त्यामागची संकल्पना तुषार गांधी यांनी स्पष्ट केली, ते म्हणाले की, सुताचा धागा नाजुक असतो, तो पटकन तुटतो, मात्र अनेक धागे एकत्र आले की ते पक्के बनतात, मजबुत होतात.. या धाग्यांसारखेच आपण सारे एकत्र आले पाहिजे, ही भावना या आगळ्या-स्वागता मागे आहे. या स्वागता वेळी तरुणांनी हाती फलक धरून Be the change you want to see in the world (जे परिवर्तन आपणास अपेक्षित आहे, तसे आपण आधी स्वतः बनू या) असा महत्वाचा संदेश दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!