नरभक्षक बिबट्याच्या ‘शूट अ‍ॅट साईट’चे आदेश

0

चाळीसगाव। दि.27 । प्रतिनिधी-तालुक्यातील वरखेडे परिसर वारंवार हल्ले करणार्‍या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीखाली आहे. बिबट्याने पाच मानवी जिवांसह बर्‍याच गुरांचा जीव घेतला आहे.

या नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याची माहिती वरखेडे येथे भेटीसाठी आलेले जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

बिबट्याच्या हल्ल्यात यापुढे एकही जीव जाणार नाही यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परतीच्या प्रवासात बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच ना. महाजन यांनी स्वतः जंगलात कसून शोध घेतला, मात्र दाट झाडांमुळे तो निसटला.

वरखेडे येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात रविवारी ठार झालेल्या वृध्द महिला सुशाबाई धना माळी (भिल्ल) वय 55 यांच्या परिवाराच्या भेटीसाठी तसेच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन चाळीसगाव येथे आले होते.

आगोदर त्यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहात संबंधीत अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यांच्यासोबत आ. उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, मुख्यवनरक्षक डि.एन.सांळुखे, उपवनरक्षक एन.आदर्श रेड्डी, विभागीय वनरक्षक श्री वावरे आदि उपस्थित होते.

यावेळी नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासंदर्भातील तीव्र भावना ग्रामस्थांनी मंत्री गिरीष महाजन यांच्यासमोर मांडल्या. यावेळी मी कालपासून वनमंत्र्याच्या संपर्कात असून त्यांनी बिबटयाला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

यापुढे एकाही गावकर्‍याचा जीव जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, त्याबाबतची सर्व यंत्रणा तालुक्यात उभी केली जाईल.

जोेपर्यंत बिबट्या मारला जात नाही तोपर्यंत या परिसरातील लाईट देखील 24 तास सुरु ठेवण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन ना. महाजन यांनी दिले.

पाच मानवी जीव गेल्यानंतर शासकिय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागली, एक जीव गेल्यानंतर यंत्रणा कामाला लागली असती तर चार जीव वाचले असते असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्या नंतर ना. महाजन यांनी वाईल्ड लाईफचे नियम कडक असल्यामुळे लवकर कारवाई करता येत नसल्याचे सांगीतले.

10 शार्पशुटर्संची नियुक्ती
बिबट्याला दिसता क्षणी ठार मारण्यासाठी 10 शॉर्पशुटरची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस विभागाकडून शॉर्पशुटर व एसएलआर गन मागविण्यात येणार आहे.

ग्रामस्थांनी देखील स्वरक्षणासाठी तरुणांची टिम उभी करण्याचे आवाहन मंत्री महाजन केले. जंगलच राहिलेले नाही म्हणून बिबटे मानवी वस्तीत प्रवेश करीत ते म्हणाले.

यापुढे पुढे वरखेडे परिसरात एकही मानवी जीव बिबट्याच्या हल्ल्यात जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा उभी केली जाईल. या परिसराला छावणीचे स्वरुप देण्यात येणार असल्याची माहितीही ना. महाजन यांनी दिली.

गावकरी म्हणाले, आम्ही बिबट्याला मारु
नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत पाच मानवी जीव घेतले आहेत. त्याचा बंदोबस्त वनविभाग करु शकत नाही, त्यामुळे बिबट्याला आता आम्हीच दिसता क्षणी मारुन टाकू, आशा भावना यावेळी मंत्री महाजन यांच्यासामोर वरखेडे येथील उपस्थित ग्रामस्थांनी मांडल्या. राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील, दिनेश पाटील यांनी देखील मंत्र्यांसमोर तिव्र भावना व्यक्त करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

मंत्र्यांनी घेतला बिबट्याचा कसून शोध
बिबट्याच्या हल्ल्यात मयत सौ.जगताप यांच्या घरून सांत्वन भेट घेऊन परतत असताना, वरखेडे येथील नवेगाव वस्ती जवळील शेतात गुरे चारणार्‍यास बिबट्या नाल्यात जाताना दिसल्याची माहिती आ. उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन यांना दिली.

त्यानंतर ना. महाजन यांनी अधिकार्‍यांसह आपला ताफा त्या भागाकडे वळवला. बिबट्या ज्या भागात दिसला, तो भाग दाट झाडी असलेला होता.

ना. महाजन यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्यक्षदर्शीच्या सूचनेनुसार शोधमोहीमेत आघाडी घेतली. आ. उन्मेश पाटील यांनी देखील गर्दीला शांतता ठेवण्याचे आवाहन करत वनविभागाच्या अधिकार्‍यांसह संपूर्ण नाल्याला घेराव घातला.

जवळपास दीड तास या नाल्यात बिबट्याचा कसून शोध घेण्यात आला. दाट झाडींचा फायदा घेत बिबट्या लपला किंवा निसटला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

*