शिवसेना – राष्ट्रवादीमध्ये जुंपली

0

जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-मुलीची छेड काढल्याच्या विषयावरून शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांमध्ये रामानंदनगर पोलिस निरीक्षक यांच्या समक्ष चांगलीच जुंपली होती.

सहकार राज्यमंत्री यांच्या राजकीय दबावातून मुलाला खोट्या गुन्हात अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे रमेश पाटील यांनी केला.

तर रमेश पाटील पोलिसांवर राजकीय दबाव टाकत असून त्यांच्याच मुलाने छेड काढली असल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शोभा चौधरी यांनी केला. याप्रकारामुळे रामानंदनगर पोलिसात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान छेडखानीप्रकरणी पोलिसात तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रभात चौकातील डॉ. वानखेडे हॉस्पिटल जवळ एमएच 19 बीडब्ल्यू 3900 वरील मोटारसायकलस्वार मुलाने एका मुलीची दि.26 रोजी दुपारी छेड काढली होती.

दरम्यान या मुलीने पोलिसात येवून तक्रार दिली. परंतू या तरुणाविरुध्द गुन्हा न दाखल झाल्याने त्यांनी याबाबत शिवसेनेच्या महिलामहानगरप्रमुख शोभा चौधरी यांना हा प्रकार सांगितला.

आज सकाळी शोभा चौधरी यांनी पोलिसात येवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान चौकशीअंती पोलिसांनी एमएच 19 बीडब्ल्यु 3900 वरीलचालक राष्ट्रवादीचे माजी जि.प सदस्य रमेश माणिक पाटील यांचा मुलगा राकेश रमेश पाटील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे शिवसेनेच्या शोभा चौधरी यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली. सुरवातीला पोलिसांनी विलंब केला.

दरम्यान पोलिसांनी संबधीत नंबरची बुलेट ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच राष्ट्रवादीचे रमेश पाटील हे देखील रामानंद नगर पोलिसात आले होते.

त्यांनी या गुन्हाशी माझ्या मुलांचा काहीही संबंध नसून खोटया गुन्हात अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिस निरीक्षकांना सांगितले.

पोलिस ठाण्यासमोर एकमेकांवर आरोप
सहकारमंत्री यांनी राजकीय दबावातून शोभा चौधरी यांना पुढे करून छेडखानीच्या गुन्हात मुलाला अटकविण्याचा प्रयत्न केला आहे. सहकार राज्यमंत्री अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करीत असल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला.

दरम्यान मुलांने छेड काढली असून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, यात सहकार राज्यमंत्र्याचा काहीही संबंध नाही असे म्हणत शोभा चौधरी यांनी देखील रमेश पाटील यांच्यावर आरोप केले.

पोलिसांसमोर दोघांनी एकमेकांवर आरोपांच्या फेर्‍या झाडल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. याप्रकारामुळे पोलिस स्टेशन परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती.

यावेळी शिवसेनचे महानगरप्रमुख शरद तायडे, गणेश सोनवणे, ज्योती शिवदे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांनी दोन्ही बाजूच्या संबंधितांवर गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या सुचना ठाणे अंमलदार यांना दिल्या.

सीसीटीव्ही तपासणीनंतर कारवाई
पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीवरून मोटारसायकल एमएच 19 बीडब्ल्यु 3900 वरील चालकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर मोटारसायकलवरील संबंधित तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*