विद्यार्थ्यांसमक्ष उत्तरपत्रिकांचे प्राध्यापकांकडून शंका निरसन कुलगुरुच्या संकल्पेनतून विद्यार्थी हितासाठी एक पाऊल पुढे : राज्यात पहिलाच उपक्रम

0

जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या अभिनव कल्पनेतून विद्यार्थी हिताचे आणखी एक पाऊल पुढे टाकत विद्यापीठाच्या प्रशाळांमधील परिक्षार्थी विद्याथ्यार्ंच्या तपासण्यात आलेल्या उत्तरपत्रिका थेट विद्यार्थ्यांच्या हातात देवून प्राध्यापकांसमोर त्यांच्या शंकाचे निरसन करणार्‍या पारदर्शी प्रयोगाला विद्यापीठाच्या भौतिकीयशास्त्र प्रशाळेच्या प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांपासून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती कुलगुरु पी.पी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी परीक्षेतील पारदर्शीपणाबाबत पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाच्या भौतिकीयशास्त्र प्रशाळेपासून या उप्रकमाला सुरवात करण्यात आली. या अभिनव प्रयोगाला ‘ओपन डे’ असे नाव देण्यात आले आहे.

भौतिकीयशास्त्र प्रशाळेत एम.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रास एनर्जी स्टडीज् या विषयाला 25 व मटेरियल सायन्स या विषयाला 27 विद्यार्थी आहेत.

या विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा नुकत्याच संपल्या. परीक्षा संपल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रशाळेतील शिक्षकांनी पूर्ण केली आहे.

आज या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या हातात या तपासलेल्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या. उत्तरपत्रिका तपासलेल्या संबंधित शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी निरसन करुन घेतले.

यावेळी मुंबईच्या राजीव गांधी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशनचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर हे सभागृहात तज्ज्ञ म्हणून हजर होते.

कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील स्वत: भौतिकीयशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे ते या ओपन डे साठी पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना थेट उत्तरपत्रिका बघायला मिळून समोरासमोर शंकांचे निरसन केले जात असल्यामुळे ओपन डे साठी प्रशाळेचे संचालक प्रा.एस.टी.बेंद्रे आणि परीक्षा समन्वयक डॉ.आर.बी.गोरे यांनी पुढाकार घेतला.

फोटोकॉपी व पूनर्तपासणी खर्च वाचणार
या उपक्रमामुळे फोटोकॉपी व पूनर्तपासणीचा विद्यार्थ्यांना लागणार्‍या खर्चाची बचत होणार आहे. सुरुवातीला हा उपक्रम विद्यापीठातील प्रशाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविणे कठीण असल्याचे परिक्षा नियंत्रक डॉ. गुजराथी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना समोरासमोर शंकांचे निरसन करुन ही उत्तरे दाखवावी लागतील. त्यासाठी सर्व प्राध्यापकांना अपडेट राहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*