बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान : दहा हजाराची मदत मिळण्याचे राष्ट्रवादीचे अमळनेर तहसीलदाराना निवेदन

0
कळमसरे, ता.अमळेनर | वार्ताहर :  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व हेक्टरी दहा हजार रुपये मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कापसाचे झाडे आणून तहसीलदार प्रदीप पाटील यांना दाखविली.

प्रारंभी भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कपाशी पिकावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन हेक्टरी दहा नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच ज्या शेतकर्‍यांनी पिक विम्याची रक्कम भरली आहे. त्यांना पिक विमा मिळावा.

परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकाची लागवड झालेली आहे. परंतु उशीरा झालेल्या पावसामुळे कपाशी पिकावर सर्रास बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशीच्या कैर्‍यामध्येही अळी आढळून येते ती संपूर्णपणे कैरी पोखरते त्यामुळे कपाशीचे बोंड फुलत नाही.

या प्रकारामुळे सर्व शेतकरी हवालदिल झाले असून त्यांचा लागवडीचा खर्च सुध्दा निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे उत्पादन देखील घटले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील अशा पिकांचे पंचनामे करावे व संबंधीत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. शासनाने भूलथापा देऊन कर्जमाफी जाहीर केली आहे व शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकर्यांच्या खात्यावर केवळ शून्य पैसे जमा झाले असा दुहेरी फटका तालुक्यातील शेतकर्यांना बसला आहे. यामुळे शेतकर्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

तरी शासनाने पंचनामे करूनअशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा रिता बाविस्कर, अलका पवार, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, विनोद कदम, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक, भागवत पाटील, भूषण पाटील, डॉ.रामलाल पाटील, देविदास देसले, उमाकांत साळुंखे, अनिल पाटील, अबीद अली सैय्यद, पप्पू कलोसे, प्रमोद पाटील, सुभाष पाटील यांच्यासह कळमसरे जळोद गटाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*