सत्ताधार्‍यांकडून ओबीसी समाजावर अन्याय – बाळबुधे

0

जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-केंद्रात व राज्यात सत्ताधार्‍यांनी बहुजन व ओबीसी समाजाला जवळ करून सत्तास्थापन केली. निवडणुकीवेळी ओबीसी समाजाला अनेक आश्वासने देण्यात आली.

परंतू सत्तेतील जातीवादी व मनुवादींनी आता ओबीसी समाजावरील सर्व सोयीसुविधा काढून घेत त्यांचा रोजगार, तरुणांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करून ओबीसींवर अन्याय केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केला.

राष्ट्रवादी कार्यालयात ओबीसी सेलची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ओबीसी समाजातील जनजागृतीनिमित्त काढण्यात येणार्‍या रथयात्रा अभियानाच्या नियोजनासाठी व समाज संघटनेसाठी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आज जळगावात आले होते

. यावेळी ओबीसीचे प्रदेशउपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन अवटे, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महिला अध्यक्षा सविता बोरसे, रविंद्रभैय्या पाटील, माजी आ. अरुण पाटील, जि.प.सदस्य शशिकांत सांळुखे, राष्ट्रवादीचे समन्वयक विकास पवार, विलास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मंगला पाटील, मिनल पाटील, लिना चौधरी, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, लता मोरे, योगेश देसले यांच्यासह ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

उठ ओबीसी जागा हो… नव्या क्रांतीचा धागा हो… हे घोषवाक्य घेवून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंत्री असतांना त्यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य व सत्ताधार्‍यांनी गेल्या तीन दिलेली आश्वासने जनतेसमोर या जनजागृती अभियान रथयात्रेच्या माध्यमातून आणण्यात येणार आहे.

तसेच रथयात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजात जनजागृती करण्यात येणार असल्याचे बाळबुधे यांनी सांगितले. सत्ताधार्‍यांनी ओबीसी समाजातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद केली असून सव्वा आठ लाख विद्याथी मागील वर्षी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहे.

राज्यात मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात खुन, गोळीबार यासारख्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे राज्यातील एकही माणूस सुरक्षित दिसत नसून राज्यकर्त पूर्णपणे अपयशी ठरत आहे.

स्व. आर.आर.पाटील गृहमंत्री असतांना त्यांनी बंद केलेेले डान्सबार सत्ताधार्‍यांनी पुन्हा सुरु केले असल्याचा आरोप यावेळी बाळबुधे यांनी केला.

19 डिसेंबरपासून जनजागृती रथयात्रा अभियान
स्पर्धा परिक्षेत ओबीसींना असलेली नॉनक्रिमीलियरची अट वगळण्यात यावी, त्यामुळे अनेक विद्यार्थी नोकरी, रोजगारापासून वंचित आहे.

मागासवर्गीय आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह निर्माण करण्यात यावे, तसेच आर्थिक विकास महामंडळातून ओबीसींना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात यासह अनेक मागण्यासाठी ओबीसी राज्यस्तरीय जनजागृती रथयात्रा अभियान चांदा ते बांधा दरम्यान तालुका स्तरावर राबविण्यात येणार आहे.

दि.19 डिसेंबर रोजी नागपुर दिक्षाभुमीपासून या अभियानाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते सुरुवात होणार असून दि.14 एप्रिलला या रथयात्रा अभियानाचा समारोप होणार असल्याचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी सांगितले.

ओबीसी नेते खडसे यांच्यावर अन्याय
ओबीसी समाजाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष झाल्याने हा समाज दुरावल्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याने ते पंतप्रधान झाले. तोच फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

मात्र विद्यमान सरकार ही मनुवादी विचारसरणीची असून त्यांच्याकडून ओबीसींवर अन्याय केले जात आहे. ओबीसी असलेले माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते मात्र त्यांच्यावरही सरकारने अन्याय केले असून त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात येत असल्याचे आरोप ओबीसी सेल राज्यउपाध्यक्ष अ‍ॅड.सचिन आवटे यांनी केला.

राष्ट्रवादीचा आजपासून हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आ. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज दि.25 ते 30 पर्यंत तालुकास्तरावर हल्लाबोल कार्यक्रम घेण्यात येणार असून तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

तसेच दि.28 रोजी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा आ. डॉ. सतिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हल्लाबोल कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दि.1 ते 11 डिसेंबर दरम्यान यवतमाळ ते नागपूर दरम्यान हिवाळी अधिवेशनावर पायी दिडीं काढण्यात येवून सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्यात येणार आहे.

पायी दिंडीत खा. सुप्रिया सुळे सलग 11 दिवस सहभागी होणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. तसेच या पायी दिडींत जिल्हयातील नेते देखील सहभागी होणार आहे.

LEAVE A REPLY

*