पेट्रोलपंपावर पिस्तुलचा धाक दाखवून दरोडा

0

वरणगाव फॅक्टरी, । दि.24 । वार्ताहर-वरणगावपासून पाच कि.मी. असलेल्या बोहर्डी गावाजवळील नागराणी पेट्रोलपंपावर अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकुन 2 लाख 60 हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पंपावरील मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग सहावर बोहर्डी गावालगत अमीत नागराणी यांचा भारत पेट्रोलीयमचा पंप आहे.

या पंपावर पहाटे 5 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर तीन व्यक्ती पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले, त्यांनी त्यांच्या गाडीत 50 रूपयाचे पेट्रोल भरले व शौचालय कुठे आहे असे कर्मचार्‍यास विचारले त्यानंतर तीघ व्यक्ती पेट्रोल पंप मॅनेजरच्या कॅबीनकडे आले.

तेथे त्यांनी पाणी पीले त्यांनतर सरळ कॅबिनमध्ये घुसले त्यांनी मॅनेजर प्रभाकर खंडारे (वय 45, रा.हद्दीवाली चाळ, भुसावळ) यास कानाजवळ पिस्तोल लावून कंपाटाच्या चाब्या मागीतल्या व पैसे कुठे आहे असे विचारले सदर मॅनेजरने नकार देताच त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करुन दुखापत केली.

चाब्या हिसकावल्या दुसरा कर्मचारी सुरेश आनंदा पाटील (रा.हिंगणे, ता.बोदवड) यास चाकु लावून चुपचाप राहण्याचे सांगीतले.

सदर आरोपींनी कपाटातील ड्रॉवर मधील 2 लाख 45 हजाराची रोख रक्कम लांबवली. तसेच दरोड्याचा सुगावा लागु नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर मशीन लंपास केले व मॅनेजरचा मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल असे एकुण 2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लांबवून मुक्ताईनगरकडे पोबारा केला व जातांना सांगीतले की, आम्ही रोडवर लागे पर्यंत बाहेर आल्यास जिवे ठार मारू त्यांनतर कर्मचारी याने मालकास फोन लावला वरणगाव पोलिस स्टेशनला कळविण्यात आले.

लागलीच पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी व पीएसआय निलेश वाघ पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहचले.

त्यांनी परिसर पिंजून काढला.सदर आरोपी हे 20 ते 25 वर्ष वयोगटातील होते व हिंदी भाषीत होते. मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधीकारी सुभाष नेवे, पीआय अशोक कडलग यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रसंगी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता. जळगाव पोलिस विभागाचे हॅप्पी नावाच्या श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे फिंगर प्रीन्ट एपीआय सचीन गांगुर्डे, त्याचप्रमाणे एलसीबीचे एपीआय सुनील कुराडे, रवि पाटील, संजय पाटील, दिपक पाटील आदींनी घटनास्थळी येवून पाहणी केली.

या प्रकरणी प्रभाकर खंडारे यांच्या फिर्यादीवर वरणगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 65/17 भा.दं.वि. 458, 392, 394, हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय जगदीश परदेशी, पोहे कॉ सुनील वाणी, नागेंद्र तायडे, महेंद्र शिंगारे, राहुल येवले, मेहरबान तडवी आदी करीत आहे.

LEAVE A REPLY

*