लिहिलेल्या नोटा घ्याव्याच लागतील

0

नवी दिल्ली । दि.24 । वृत्तसंस्था-500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेले असले तरी आता चिंता करण्याची गरज नाही. त्या नोटाही बँकांना स्वीकाराव्या लागतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

त्या नोटा बदलून घेता येणार नाहीत; पण संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करता येणार आहेत, असेही बँकेने स्पष्ट केले.

500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेले असल्यास त्या बँकांमध्ये स्वीकारल्या जात नाहीत. यामुळे बँक कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये खटके उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.

लिहिलेल्या नोटा वैध की अवैध याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने हा संभ्रम दूर केला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात येणार्‍या लोकांना याबाबत जागरुक करण्यात येत आहे.

नोटांवर काही लिहिले असल्यास किंवा त्यावर रंग लागला तरी त्या वैध आहेत. त्या स्वीकारण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

10 रुपयांचे नाणे वैध
अनेक दुकानदार 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पण ते नाणे वैध आहे. यासंबंधी मेळाव्यात अधिसूचना लावण्यात आली आहे. तसेच डिजिटल व्यवहार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘त्या’ नोटांना वैयक्तिक खात्यात स्थान
ग्राहकांना ‘त्या’ नोटा बँकांतून बदलून घेता येणार नाहीत. पण आपल्या वैयक्तिक खात्यात जमा करू शकतात, असेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. बनावट नोटा ओळखता याव्यात यासाठी लोकांना नोटांवरील फिचर्ससंबंधी माहिती देण्यात येते. 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर 17 फिचर आहेत. तर 50 रुपयांच्या नोटेवर 14 फिचर असल्याची माहितीही अधिकार्‍यांनी दिली.

LEAVE A REPLY

*