पिंप्राळ्यातील गणपती नगरात सशस्त्र दरोडा

0

जळगाव । दि. 23 । प्रतिनिधी-शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरातील पाटील कुटूंबिय घरात झोपलेले असतांना मागील खोलीचा दरवाजा तोडून पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखूवन घरातील 45 ग्रॅम वजनाच्या सोन्यासह 40 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

यावेळी दरोडेखोरांनी घरातील जेवण भांडयांमध्ये मागून घेत भांडे देखील चोरून नेले आहे. घटनेची माहिती कळताच रात्रीच्या गस्ती पथकातील स्थानिक गुन्हे शाखा, शहर, तालुका व रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत दरोडेखोर फरार झाले होते.

त्यानंतर सकाळी तसेच ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारासत चोरटयांनी पिंप्राळा हुडको परिसरातील सिध्दार्थ नगरातील घरात कुटुंबिय झोपलेले असतांना मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून 12 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

दरम्यान चोरटयांने घरमालकाचा बुट घालून त्याचा बुट घराबाहेर सोडून दिला होता. पोलिसांनी हा बुट ताब्यात घेतला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील मुळेचे रहिवासी सुरेश रमेश पाटील हे पिंप्राळयातील गणपतीनगरात पत्नी प्रिती, मुलगा अरमान व मुलगी खुशी यांच्यासोबत गेल्या दिड वर्षांपासून वास्तव्यास आहेत.

सुरेश पाटील हे सुनिल एंन्टरप्राईझेस येथे कामाला आहेत पाटील यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ अनिल पाटील हे पत्नीसोबत भेटीसाठी आले होते.

काल दि.22 रोजी रात्री जेवन झाल्यानंतर पाटील कुटूंबिय झोपले होते. मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास पाटील कुटूंबिय घरात झोपलेले असतांना पाच दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याला जोरात धक्का दिला.

आवाज झाल्याने सुरेश यांना जाग आली. मात्र, काही समजण्याच्या आताच दोन दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत त्यांच्या गळ्याला चाकु लावून घरातील सोने-दागिने व रोकड देण्यास सांगितले.

तर दोन दरोडेखोर घराबाहेर उभे होते तर एक कंपाऊडच्या बाहेर उभा होता. त्यांनी घरातून कपाट फोडून सोने व रोकड चोरली. दोन्ही दरोडेखोरांनी सुरेश पाटील व त्यांच्या पत्नी प्रिती पाटील यांना कपाटातून दागिने काढण्यास सांगितले.

त्यानी भितीपोटी कपाटातील 30 ग्रॅम वजनाचे दागिने दरोडेखोरांना काढून दिले यानंतर दोघं दरोडेखोर घराबाहेर येवून चर्चा करू लागले.

चर्चेनंतर पुन्हा त्यांनी घरात जावून पुढील खोलीत झोपलेले अनिल पाटील व त्यांच्या पत्नी यांना त्यांच्याजवळील रोकड व दागिने देण्यास सांगून त्यांना धमकावले.

यानंतर अनिल यांच्या गळ्यातील चैन व सहा हजार रूपयांची रोकड व पत्नीजवळील 15 ग्रँम सोने हिसकावून दोन्ही दरोडेखोर बाहेर पडले. पुन्हा दरोडेखोरांनी आपआपसात चर्चा केली व पुन्हा घरात प्रवेश केला होता.

अन् पोलिसांना लावला फोन…
दरोडेखोरांनी चोरी करण्याआधी घरातील एक मोबाईल माळोच्यावर तर दुसरा मोबाईल पंलगाखाली फेकून दिला होता. परंतू, सुरेश पाटील यांच्या पत्नी प्रिती यांनी एक मोबाईल लपवून ठेवला होता. चोरटे दागिने व पैसे सावरण्यात व्यस्त असतांना त्यांनी बाथरूमध्ये जावून घाबरत-घाबरत तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांना संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. शहरात दोन गणपती नगर असल्याने पोलिसांना देखील संभ्रम निर्माण झाला होता. तरी पोलिसांनी पिंप्राळा येथील गणपतीनगरात घराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर दरोडेखोर चोरी करून गेल्यानंतर पोलिसांना घर सापडले. यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे सचिन बागुल व डिबी कर्मचार्‍यांनी परिसराची पाहणी केली.

शेजारच्यांना दिली हाक
दरोडेखोर चोरी करण्यात व्यस्त असतांना घरातील लहान मुलाने कसे तरी पाण्याच्या बहाण्याने पुढचा दार उघडून शेजारी राहणार्‍यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि आरोड्या दिल्या. घरातील एकही सदस्य बाहेर आला नाही. अन्यथा ही घटना टळली असती व एका तरी दरोडेखोरास पकडण्यात यश आले आले असते. पाचही दरोडेखोर चोरी केल्यानंतर हुडकोच्या दिशेने पसार झाले होते. दरम्यान, या घटनमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांकडून पाहणी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बागुल व कर्मचारी तसेच शहर पोलिस स्टेशनचे डिबी कर्मचारी विजयसिंग पाटील, एलसीबीचे पोलिस निरिक्षक सुनिल कुराडे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, विजय पाटील, जयंत चौधरी आदी कर्मचारी तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोनि सुनिल गायकवाड, पीएसआय गजानन राठोड व सर्व पोलिस डिबी कर्मचारी गणपतीनगरात दाखल झाले. त्यानंतर ठसे तज्ञ पथक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात भादवी कलम 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडेखोरांनी जेवण व भांडे देखील नेले
तिसर्‍यांदा घरात दरोडेखोरांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी घरात जेवन देण्यासाठी चाकुचा पुन्हा धाक दाखविला. यानंतर सुरेश पाटील यांनी किचन रूम दाखविल्यानंतर दरोडेखोरांनी भांड्यातील मच्छीचे जेवन तसेच लोटयात पाणी भरून घेवून गेले. पसार होण्याआधी तुझे मारणे की सुपारी दिया था पर सोना और पैसे मिल गये इस लिये छोड दिया, अशी धमकी दरोडेखोरांनी दिली होती.

दरोडेखोरांकडून हिंदी बोलण्याचा प्रयत्न
दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवून पाटील दाम्प्त्यांना धमकाविले. झसको मार डालेंगे, चुपचाप घरमेंका जोभी है ओ दे दो, हम आपको कुछ नही करेंगे अशा तोडक्या मोडक्या भाषेत दरोडेखोर हिंदी बोलण्याचा प्रयत्न करीत होते.

संशयितांची पोलिसांकडून चौकशी
रामानंद नगर पोलिसांनी या दरोडयाप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली. परंतू काही ठोस पुरावे हाती लागले नसल्याचे समजते. दरम्यान डीवायएसपी सचिन सांगळे यांनी दरोडयातील संशयित स्थानिक असल्याचा अंदाज व्यक्त केला असून लवकरच दरोडखोरांना अटक करण्यात येईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

*